पानमंद यांना पाठीशी घालणारे गटशिक्षणाधिकारी बुगे यांच्यावर कारवाई करा पारनेर । नगर सह्याद्री तालुक्यातील हिवरा कोरडा येथील मांजरधाव प्राथ...
पानमंद यांना पाठीशी घालणारे गटशिक्षणाधिकारी बुगे यांच्यावर कारवाई करा
पारनेर । नगर सह्याद्री
तालुक्यातील हिवरा कोरडा येथील मांजरधाव प्राथमिक शाळेवर गोरेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव पानमंद यांनी पतसंस्थेचा कर्मचारी कुलदीप जाधव शिक्षक म्हणून गेल्या सात वर्षापासून दोन ठिकाणी शिक्षण विभागाच्या परस्पर नियुक्त केला होता. यासंबंधीची तक्रार फेब्रुवारी 2022 मध्ये शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेकडे केली असतानाही कारवाई का केली नाही, असा सवाल आता पालक व ग्रामस्थांनी केला आहे. प्राथमिक शिक्षक बाजीराव पानमंद यांना पाठीशी घालणारे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब घुगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गेल्या सात वर्षापासून शिक्षण विभागाला चुना लावणार्या बाजीराव पानमंद या शिक्षकावर कारवाई का झाली नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क होत आहे. एवढी अनागोंदी चालू असताना शिक्षण विभाग झोपला होता का, असा सवाल आता पालक आणि ग्रामस्थ करत आहेत. मांजरधाव येथील वस्ती शाळेवर कुलदीप जाधव बेकायदेशीर अध्यापनाचे काम करीत असल्याची बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा गणेश अडसुळ यांच्या लक्षात आली. त्यांनी त्याबाबत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकार्यांकडे तक्रार केली.
तसे निवेदन गटविकास अधिकारी, गट विकास अधिकारी यांना 18 फेब्रुवारी 2022 रोजी देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटून गेले तरी त्यावर काहीही कार्यवाही होत नव्हती. गावामध्ये बेकायदेशीर शिक्षकाची चर्चा रंगलेली असताना एका ग्रामस्थाने 112 या पोलिस मदत केंद्राच्या नंबरवर फोन करून तक्रार दाखल केली. त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचार्यांनी शहानिशा केली असता तेथे कुलदीप जाधव बेकायदेशीररित्या अध्यापन करीत असल्याचे आढळून आले.पोलिस कर्मचार्यांनी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांना घटनास्थळी पाचारण करून संबंधितावर कारवाईबाबत निर्णय घेण्यास सांगण्यात आले. याबाबत पारनेर पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आल्याचे पोलिस कर्मचारी जालिंदर लोंढे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंंद यांंनी आपल्या जागेवर गोरेश्वर पतसंस्थेच्या कर्मचार्याची मांजरधाव (हिवरे कोरडा) या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून बेकायदेशीर नियुक्ती केली. कुलदीप जाधव याने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांना दिलेल्या जबाबामध्ये गेल्या सात वर्षांपासून चेअरमन बाजीराव पानमंद यांच्या सांगण्यावरून आपण पाच वर्षे डिकसळ येथील शाळेत तर दोन वर्षांपासून मांजरधाव येथील शाळेत अध्यापन करीत असल्याचे सांगितले आहे.
COMMENTS