अनियमितता, गैरकारभार ः इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिवांचा आदेश पारनेर । नगर सह्याद्री तालुक्यातील ढवळपुरी येथील धन्वंतरी ...
अनियमितता, गैरकारभार ः इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिवांचा आदेश
पारनेर । नगर सह्याद्री
तालुक्यातील ढवळपुरी येथील धन्वंतरी मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशनच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये गंभीर स्वरुपाची अनियमितता, गैरकारभाराच्या बाबी चौकशी समितीतून पुढे आल्याने या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याबरोबरच दोन लाखांची दंड ठोठावण्यात आला आहे.
अनियमितता, गैरकारभार यामुळे राज्याच्या इतर मागास बहुजन संचालनालयाचे संचालक सिद्धार्थ झाल्टे यांनी आश्रमशाळेवर प्रशासक नेमण्याची शिफारस शासनाकडे केली होती. याविरुद्ध तक्रारदार संभाजी रोहोकले यांनी विनापरवानगी आश्रमशाळेचे स्थलांतर व गंभीर अनियमितता असल्याने आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्याकडे 1 ऑगस्ट 2022 रोजी अपिल पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. अपिलावर सुनावणी होवून इतर मागास बहुजन कल्याण विभाग संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचा प्रशासक नेमणूकीसह आदेश कायम ठेवत विनापरवानगी आश्रमशाळेचे स्थलांतर व गंभीर स्वरुपाच्या अनियमितता यास्तव संस्थेवर दोन लाख रुपये दंडात्मक कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाकडे पुराव्यासह तक्रार संभाजी रोहोकले यांनी केली होती. त्यानंतर मंत्रालयाकडून समाजकल्याणच्या नाशिक प्रादेशिक उपायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी समितीने आश्रमशाळेची तपासणी करून अहवाल सादर केला होता. अहवालात आश्रमशाळेबाबत गंभीर बाबी व अनियमितेबाबाबत नोंदी होत्या. प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण (पुणे) यांनाही फेरतपासणीचे आदेश संचालकांनी दिले होते. नाशिक व पुणे विभाग उपायुक्तांनी दिलेल्या अहवालावर 3 जून 2022 रोजी इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक सिद्धार्थ झाल्टे यांच्यासमोर सुनावणी झाली. आश्रमशाळेबाबत गंभीर स्वरुपाच्या अनियमिततेसोबतच आश्रमशाळेचे विनापरवानगी स्थलांतर करुन शासन निर्णयाचा भंग केल्याचे सिद्ध झाले होते. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालकांच्या आदेशातील अल्फा या संस्थेला बक्षीस म्हणून जी जागा दिली ती धन्वंतरी संस्थेने पुढील तीन महिन्यांत परत घ्यावी. ही जागा धन्वंतरी या संस्थेच्या नावावर करण्यात आल्याबाबतची खात्री सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी करून तसा अहवाल संचालनालयास सादर करावा. जागा संस्थेच्या नावावर होईपर्यंत या विभागामार्फत संस्थेला इमारत भाडे देण्यात येऊ नये. सहाय्यक आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी संयुक्त तपासणी करून आश्रमशाळेला या कालावधीत दिलेले इमारतभाडे संस्थेकडून पुढील तीन महिन्यात वसूल करून शासनजमा करावे, सहायक आयुक्तांनी सखोल तपासणी करून शाळेची मान्यता रद्द करावी किंवा कसे याबाबतचा अहवाल तीन महिन्यात संचालनालयास सादर करावा, असा आदेश आपर मुख्य सचिवांनी कायम केला आहे.
अपर मुख्य सचिव इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य नंदकुमार यांनी अपिलावर सुनावणी देत शासन निर्णय क्र. विभशा-1096/प्र.क्र.173/मावक-6, दिनांक 18/09/1996 अन्वये धन्वंतरी मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर या संस्थेस ढवळपुरी (ता. पारनेर) सुतखाडी म्हणजेच सुतारवाडी प्राथमिक आश्रमशाळेस मान्यता दिलेली आहे. संस्थेने प्राथमिक आश्रमशाळेला मान्यता घेताना तो ढवळपूरी अहमदनगर येथील सुतारवाडीत चालविण्यात येईल असे आश्वासित केले असले तरी काही वर्ष आश्रमशाळा चालवून विनापरवानगी आश्रमशाळेचे ढवळपुरी येथे स्थलांतर केल्याचे दिसून येते. संस्थेने मान्यता दिलेल्या ठिकाणी प्राथमिक आश्रमशाळा चालविली नाही. संस्थेने सुतारवाडीहून आश्रमशाळेचे ढवळपुरी येथे स्थलांतर केले. आश्रमशाळेचे 5 किमी अंतरावर स्थलांतर झाले आहे. यासाठी शासनाची, संबंधित विभागाची परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही, असे अहवालात नमूद केले आहे. धन्वंतरी मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन, अहमदनगर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सईद अहमद काझी यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कार्यरत असलेले सर्व क्षेत्र दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 अनु. क्र. 871, दि. 02/03/2007 रोजी अल्फा सोशल अॅण्ड एज्यूकेशन फाउंडेशन, अहमदनगर या संस्थेच्या नांवे बक्षीसपत्र करून दिले आहे. डॉ. सईद अहमद काझी दोन्ही संस्थेचे अध्यक्ष आहेत. धन्वंतरी मेडीकल अॅण्ड एज्युकेशनल फाउंडेशन, अहमदनगर संस्थेच्या इमारतीच्या तळ मजल्यावर या विभागाच्या अखत्यारित येत नसलेले अल्फा सोशल अॅण्ड एज्युकेशन फांउडेशन, अहमदनगर या संस्थेचे उच्च महाविद्यालय सुरु असल्याचे आढळले. त्यामुळे एकाच जागेचा दोन संस्थांनी वापर केल्याचे दिसून येते. संस्थेने आश्रमशाळा चालविण्यासाठी दर्शविलेली जागा विभागाच्या परवानगीशिवाय इतर संस्थेला बक्षीस म्हणून दिली आहे.
गुणात्मक तपासणी अहवालात गुणांकानुसार प्राथमिक आश्रमशाळेस 200 पैकी 154, माध्यमिक आश्रमशाळेस 200 पैकी 155 आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळेस 200 पैकी 156 गुण प्राप्त आहेत. संस्थेने आश्रमशाळांसाठी ठरविलेली जागा व इमारत इतर संस्थेला बक्षिस म्हणून देऊन त्याचेमार्फत शासनाचे इतर उपक्रम राबवून एकाच जागा इमारतीसाठी दोन ठिकाणाहुन अनुदान घेतले आहे. संस्थेने शासनाच्या जिल्हा परिषद, अहमदनगर यांचेकडील हंगामी वसतिगृह आश्रमशाळांच्या इमारतीमध्ये चालविले आहे. त्यावेळी संस्थेने हंगामी वसतिगृहासाठी जिल्हा परिषदेकडून इमारत भाड्यापोटी निधी प्राप्त करून घेतला. धन्वंतरी मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन संस्थेची दुसरी संलग्नित संस्था अल्फा सोशल अण्ड एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेमार्फत चालविण्यात येत असलेल्या आयझॅक इंग्लिश मिडियम स्कूल, भाळवणी (ता. पारनेर) या शाळेच्या माध्यमातून संस्थाचालकांनी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेमध्ये शिक्षण देणे, ही आदिवासी विकास विभागाची योजना सन 2010-11 पासून राबविली व त्यासाठी अनुदान घेतले. तथापि, याबाबत आदिवासी विकास विभागाने चौकशी करुन योजनेंतर्गत दिलेली मान्यता शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून शासन पत्र क्र. नानिशा- 2020/प्र.क्र.79/का-12, दि.18/11/2021 अन्वये रद्द केलेली आहे. आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत या योजनेतील विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी आयझॅक इंग्लिश मिडियम स्कूल, भाळवणी यांचे दि. 04/06/2020 अन्वये शाळेचे वसतिगृह उपलब्ध नसल्याने धन्वतरी मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन संस्थेच्या विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत योजनेतील विद्यार्थ्यांची निवासाची सोय केल्याने शासनाच्या दोन विभागाकडून दोन स्वतंत्र योजनांसाठी एकाच वसतिगृहाचा वापर करून भाडे घेतल्याचे दिसून येते.
महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय (मुलांची काळजी व संस्था) अधिनियम 2015 अंतर्गत शासन निर्णय दिनांक 8 मार्च 2020 अन्वये अहमदनगर जिल्हयाकरिता अल्फा सोशल अॅण्ड एज्यूकेशन फाउंडेशन व धन्वंतरी मेडिकल अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन, अहमदनगर अनुक्रमे 50 मुलीसाठी व 75 मुलांसाठी बालगृह मंजूर केले होते. बालगृहे मंजूर करतांना विभागाच्या आश्रमशाळांकरीता निश्चित केलेल्या ढवळपुरी या वसतिगृहाच्या ठिकाणी पुढील 5 वर्षाकरिता देण्यात आल्याचे दिसून येते. संस्थेला आश्रमशाळा चालविण्यास मान्यता देतांना संस्थेने कळविलेल्या जागेत इतर विभागाचे उपक्रम चालविल्याचे दिसते. धन्वंतरी फाऊंडेशन संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, ढवळपुरी या आश्रमशाळेने संभाजी देवराम रोहोकले यांच्या पूनर्विलोकन अर्जामधील मुद्यांप्रमाणे दाखल खुलासा व तक्रारी समर्थनार्थ सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, संभाजी देवराम रोहोकले यांनी आश्रमशाळेविरूद्ध दाखल केलेले अपील अंशतः मान्य करण्यात येत असून संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा आदेश कायम करण्यात येत आहे.
धन्वंतरी संस्थेने मु. सुतारवाडी येथून आश्रमशाळा ढवळपुरी येथे स्थलांतरीत करताना कोणताही पत्रव्यवहार शासनाकडे केलेला नाही. यामुळे स्थलांतरासाठी अटी व शर्तीतील मुद्दा क्र.9 नुसार अवैध आहे. त्यानुसार संस्थेने शाळेचे स्थलांतर करणे शासन निर्णयास अनुसरून नाही, तसेच संस्थेच्या एकूण कामकाजाबाबत अनेक गंभीर स्वरुपाच्या अनियमितता अपिलकर्त्याने सुनावणीवेळी सादर केलेल्या कागदपत्रांवरून निदर्शनास आल्या आहेत. यास्तव संस्थेला दोन लाख रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मान्यता रद्द करावी ः संभाजी रोहकले
शासनाच्या परवानगीशिवाय शाळेचे स्थलांतर झाले तर शासन निर्णयानुसार शाळेची मान्यता रद्द होते. सुतारवाडी येथून ढवळपुरी येथे आश्रमशाळेचे स्थलांतर झाले असतानाही अपर मुख्य सचिव इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालय यांनी मान्यता रद्द करण्याऐवजी शाळेवर प्रशासक नेमला. हा संस्थेला अभय देण्याचा प्रकार आहे. शासन निर्णयानुसार कारवाई झाली नाही. शासन निर्णय प्रमाणे आश्रमशाळेची मान्यता तातडीने रद्द करावी औरंगाबाद खंडपीठात या विरोधात धाव घेणार असल्याचे संभाजी रोहकले यांनी सांगितले.
COMMENTS