गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद यांचा प्रताप । 7 वर्षांपासून पतसंस्थेचा कर्मचारी करतोय अध्यापन पारनेर । नगर सह्याद्री जिल्हा परिषद...
गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद यांचा प्रताप । 7 वर्षांपासून पतसंस्थेचा कर्मचारी करतोय अध्यापन
पारनेर । नगर सह्याद्री
जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंंद यांंनी आपल्या जागेवर गोरेश्वर पतसंस्थेच्या कर्मचार्याची मांजरधाव (हिवरे कोरडा) या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून बेकायदेशीर नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. अनधिकृतपणे काम करणार्या तरूणाने आपण गेल्या सात वर्षांपासून पानमंद यांच्या जागेवर अध्यापनाचे काम करीत असल्याचा जबाब गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याकडे नोंदविला आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुवर्ण गणेश आडसूळ यांनी यासंबंधीची तक्रार 18 फेब्रुवारी 2022 रोजी लेखी स्वरुपात गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याकडे केली होती. परंतु त्यांनी यावर कोणत्या प्रकारची कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंबंधीची तक्रार पारनेर पोलिसात पण नोंदवण्यात आली होती. त्यानुसार अखेर पारनेर पोलिसांनी थेट शाळेवर धडक देत या बोगस प्रकरण पर्दाफाश केला आहे. गोरेश्वर पतसंस्थेचा कर्मचारी कुलदिप जाधव हा डी.एड. झालेला आहे.
शिक्षकाची नोकरी मिळत नसल्याचे त्याने गोरेश्वर पतसंस्थेत नोकरी स्विकारली. डी. एड. झालेला कर्मचारी मिळाल्यानंतर चेअरमन पानमंद यांची आयती सोय झाली. त्यांनी गेल्या सात वर्षापासून या कर्मचार्याचा वापर करून घेत त्याला त्यांच्या जागेवर अध्यापनास जाण्याची सक्ती करण्यात आली. पाच वर्षे डिकसळ येथील शाळेत तर दोन वर्षे मांजरधाव (हिवरे कोरडा) येथील शाळेत हा अनधिकृत शिक्षक विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत होता. तर चेअरमन पानमंद हे पतसंस्था व्यवस्थापन तसेच राजकारणात सक्रीय होते.
मांजरधाव येथील वस्ती शाळेवर कुलदिप जाधव हा शिक्षक बेकायदेशीर अध्यापनाचे काम करीत असल्याची बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा गणेश अडसुळ यांच्या लक्षात आली. त्यांनी त्याबाबत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली. तसे निवेदन गटविकास अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांना दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजीच देण्यात आले होते.
मात्र वर्ष उलटून गेले तरी त्यावर काहीही कार्यवाही होत नव्हती. गावामध्ये बेकायदेशीर शिक्षकाची चर्चा रंगलेली असताना एका ग्रामस्थाने 112 या पोलिस मदत केंद्राच्या नंबरवर फोन करून तक्रार दाखल केली. त्यानुसार पारनेर पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचार्यांनी शहानिशा केली असता तेथे कुलदिप जाधव हा बेकायदेशीररित्या अध्यापन करीत असल्याचे आढळून आले.
पोलिस कर्मचार्यांनी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांना घटनास्थळी पाचारण करून संबंधितावर कारवाईबाबत निर्णय घेण्यास सांगण्यात आले. याबाबत पारनेर पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आल्याचे पोलिस कर्मचारी जालिंदर लोंढे यांनी सांगितले.
कुलदिप जाधव याने गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांना दिलेल्या जबाबमध्ये गेल्या सात वर्षांपासून चेअरमन बाजीराव पानमंद यांच्या सांगण्यावरून आपण पाच वर्षे डिकसळ येथील शाळेत तर दोन वर्षांपासून मांजरधाव येथील शाळेत अध्यापन करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही.
COMMENTS