एंटरटेनमेंट । नगर सह्याद्री - एअर इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत प्रवाशाने सहप्रवासी वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार ताजा...
एंटरटेनमेंट । नगर सह्याद्री -
एअर इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत प्रवाशाने सहप्रवासी वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार ताजा असतानाच आता इंडिगोच्या विमानात दारूच्या नशेत प्रवाशांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.
विमानांमध्ये प्रवाशांकडून गोंधळ घालण्याच्या घटना काही थांबायचे नाव घेत नाही. आता इंडिगो विमानात प्रवाशांनी धिंगाणा घातला आहे. प्रवाशांनी दारू पिऊन गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीहून पाटण्याला हे इंडिगोचे विमान येत होते. दरम्यान, विमानतळावर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विमानतळावरील एसएचओ रॉबर्ट पीटर यांनी दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशांना अटक केल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. दोघांनाही कोर्टात हजर केले जाणार आहे. दोघेही इंडिगोच्या 6E-6383 या विमानातून प्रवास करत होते.
दारू पिऊन धिंगाणा घालणारे दोन्ही आरोपी प्रवासी हे बिहारचे आहे. त्यांनी विमानात दारूच्या नशेत धिंगाणा घातला. विमानातील क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले. तसेच हवाई सुंदरीचा विनयभंगही केला, असा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनी वैमानिकालाही मारहाण केल्याचा आरोप आहे. रविवारी रात्री ८.५५ च्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
हे दोन्ही प्रवासी दिल्ली येथून विमानात बसले होते. दोघेही दारूच्या नशेत होते. रिपोर्टनुसार, दोघेही आरोपी हे बिहारचे रहिवासी आहे. दिल्लीत ते दारू प्यायले. नशेत धुंद होते. विमानात बसल्यापासून दोघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, या प्रवाशांनी विमानात गोंधळ घातल्याच्या वृत्ताचे खंडन इंडिगोशी संबंधित सूत्रांनी केले आहे.
कंपनी प्रशासनाच्या माहितीनुसार, हे प्रवासी दारू सोबत घेऊन जात होते. तसेच विमानात दारू पित होते. त्यांनी विमानात गोंधळ घातला नाही. विमानातील क्रू मेंबरने त्यांना समज दिल्यानंतर त्यांनी दारू पिणे बंद केले आहे.
विमानतळावर विमान उतरताच क्रू मेंबर्सकडून प्रोटोकॉलनुसार सुरक्षा आणि एटीसी यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. दरम्यान, बिहारमध्ये दारूबंदी असल्याने आरोपींना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अलीकडेच, गोवा-मुंबई विमानातही क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला होता. दोन विदेशी प्रवाशांनी क्रू मेंबरसोबत गैरवर्तन केले होते. दोघांनाही गोव्यातच विमानाने उड्डाण घेण्याआधीच उतरवण्यात आले होते. त्यांना सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले होते.
COMMENTS