मालपाणी उद्योग समूह; प्रजासत्ताक दिनी सुरक्षा रक्षकांच्या कामाचा गौरव संगमनेर | नगर सह्याद्री देशाच्या सुरक्षेसाठी ज्या प्रमाणे लष्कराचे जव...
मालपाणी उद्योग समूह; प्रजासत्ताक दिनी सुरक्षा रक्षकांच्या कामाचा गौरव
देशाच्या सुरक्षेसाठी ज्या प्रमाणे लष्कराचे जवान प्राणाची बाजी लावतात, त्याच प्रमाणे औद्योगिक सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत महत्त्वाची असते. सुरक्षा विभागाच्या अचूक कामगिरीमुळेच उद्योगधंदे, कारखाने सुरक्षित राहून प्रगती करु शकतात. त्यामुळे दरवर्षी प्रजासत्ताक दिनी मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा जवानांचा विशेष सन्मान करण्याची पद्धत आपण जोपासली आहे. आजच्या दिवशी आपण देशातील सुरक्षा यंत्रणांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतांनाच आपला देश प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांनी केले.
प्रजासत्ताक दिनी मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये त्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यवस्थापक रमेश घोलप, मानव संसाधन विभागाचे प्रमुख शिवाजी आहेर, उत्पादन विभागाचे प्रमुख देवदत्त सोमवंशी, कामगार नेते कॉ.माधव नेहे, सुरक्षा विभागाचे प्रमुख भारत मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मालपाणी म्हणाले की, स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिन आपले राष्ट्रीय सण आहेत. या दिनी सुरक्षा क्षेत्रामध्ये काम करणार्या प्रत्येक घटकाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रघात आहे. मालपाणी उद्योग समूहात कामगारांच्या सुरक्षेवर आणि कल्याणवर विशेष लक्ष दिले जाते. यात सुरक्षा रक्षकांची भूमिका खूप मोठी असून त्यांच्या कामाचा सन्मान म्हणून दरवर्षी त्यांच्या विशेष सन्मान करण्याची पद्धत आपल्या उद्योग समुहात राबविली जात असल्याचे ते म्हणाले.सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत असून जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होण्याची वेळ आता जवळ आली आहे. भविष्यात रोजगारांच्या मोठ्या संधी देशात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तरुणांनी सोशल माध्यमांमध्ये विनाकारण वेळ घालवू नये तर उपलब्ध असलेले विविध ऑनलाइन कोर्सेस करुन त्यातून आपल्या भविष्याला कलाटणी देण्याचे काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी उद्योग समुहाच्या सुरक्षा विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या आरिफ शेख, योगेश सातपुते, प्रमोद कौठे आणि सुरक्षा कमांडर ऋषिकेश आप्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सुरक्षा जवानांनी दिमाखदार संचलन सादर केले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुरारी देशपांडे यांनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची देशभक्तीपर कविता सादर केली. भारत मोरे यांनी प्रास्तविक केले. संतोष राऊत यांनी सूत्रसंचालन तर तिलाराम रावत आभार मानले.
COMMENTS