सुवासिनी, विधवा भगिनींचा अनोखा हळदीकुंकू समारंभ | उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा भालेकरांनी केला सन्मान पारनेर | नगर सह्याद्री अंधश्रद्धा, बुरस...
सुवासिनी, विधवा भगिनींचा अनोखा हळदीकुंकू समारंभ | उपनगराध्यक्षा सौ. सुरेखा भालेकरांनी केला सन्मान
पारनेर | नगर सह्याद्रीअंधश्रद्धा, बुरसटलेल्या प्रथांचा आजच्या आधुनिक युगात बिमोड करणे गरजेचे आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे. तिला समाजात एक स्वतंत्र स्थान असल्याने तिला सन्मानाने जगता आले पाहिजे. स्त्रीने न्याय हक्कांसाठी समाजासमोर ताठ मानेने उभी राहत प्रगतीपथावर येण्याची गरज आहे, असे मत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणीताई लंके यांनी पारनेर येथील हळद-कुंकू समारंभात व्यक्त केले आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष सुरेखा अर्जुन भालेकर यांनी सुवासिनी व विधवा भगिनींचा अनोखा हळदीकुंकू समारंभ नवा आदर्श समाजापुढे निर्माण केल्याचे गौरवोद्गार राणीताई लंके यांनी काढले. शहरातील सुवासिनी व विधवा महिला भगिनींना आमंत्रित करत त्यांना मान वान वाटप करत हळदी कुंकवाचे आयोजन करत रविवारी (दि. २२) हा समारंभ झाला.
जिल्हा परिषद सदस्य राणीताई नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात बोलताना विधवा महिलांनाही समाजात सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. कॉम्प्युटर युगात महिलांनी सक्षम बनवून या अनिष्ट प्रथा झुगारण्याचा प्रयत्न करावा. एका महिलेने दुसर्या महिलेला सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. एकीकडे देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करत असताना दुसरीकडे स्त्रियांना समाजात दुय्यम वागणूक मिळते. पारनेर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर यांनी राबवलेला हा हळदी कुंकवाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे राणीताई नीलेश लंके म्हणाल्या.
ऐतिहासिक महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणासाठी क्रांतीची ज्योत लावणार्या अनेक राजमाता तसेच महिला क्रांतिकारकांनी माझी महाराष्ट्राची कन्या ही सक्षम झाली पाहिजे, सती प्रथेविरोधात मोठी चळवळ उभी करून प्रथा बंद करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. समाजामध्ये विधवांना योग्य सन्मान मिळावा. त्यासाठी क्रांतिकारी विचाराच्या अनेक राजमातांनी प्रयत्न केला. अजूनही विधवांना दुर्लक्षित ठेवले जाते. राज्य सरकारने विधवांसाठी विविध उपक्रम राबवले. पारनेर नगरपंचायतमध्येही उपनगराध्यक्षा सुरेखा अर्जुन भालेकर यांनी ठराव मंजूर करून घेतला. पारनेर शहर व तालुयातील सुवासिनी, विधवांचा हळदीकुंकू कार्यक्रमात सहभाग नोंदवत प्रेरणादायीउपक्रम राबवत एक वेगळेपण सिद्ध केले. यावेळी नगरपंचायत नगराध्यक्षांच्या पत्नीसह नगरसेविका उपस्थित होत्या.
विधवा प्रथा बंदी संदर्भात नगरपंचायतमध्ये घेतला होता ठराव..
सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ भोसले यांनी स्त्रियांबद्दलचा विविध संकल्पना राबवत त्यांच्या विषयी केलेले कार्य समाजाला दाखविले. त्याचीच प्रेरणा घेऊन आपला सामाजिक उपक्रम राबवत कोल्हापूरचा हेरवाड गावचा विधवा प्रथा बंदी ठराव झाल्यावर आपल्या पारनेर नगरपंचायत मध्ये ७ जून २०२२ रोजी विधवा प्रथा बंदी ठराव केला व त्याचे अंमलबजावणी म्हणून हळदीकुंकवाच्या निमित्ताने सुवासिनी व विधवा महिलांना आमंत्रित करत प्रबोधन करण्याचा प्रयत्न उपनगरअध्यक्षा सुरेखा भालेकर यांनी केला. प्रत्येक महिलेला येथोचीत भेटवस्तू देत त्यांचे फोटो घेत एक वेगळेपण सिद्ध केले.
COMMENTS