मुंबई । नगर सह्याद्री - जिजामाता कोण होत्या काय आहे त्यांचा जीवनप्रवास जिजामाता ह्या एक महिलांसाठी आदर्श आहे व त्या आदिशक्ती होत्या प्रसंग ...
मुंबई । नगर सह्याद्री -
जिजामाता कोण होत्या काय आहे त्यांचा जीवनप्रवास जिजामाता ह्या एक महिलांसाठी आदर्श आहे व त्या आदिशक्ती होत्या प्रसंग होता अफजल खानाच्या वधाचा. रायबा महाराजांना सांगतात की, 'महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाच सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागण अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठतरी अज्ञात स्थळी निघून जा'. त्यावेळी माँसाहेब म्हणजेच जिजाऊ आईसाहेब म्हणाल्या, 'रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जावून या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता काम नये'.
ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिकचातुर्याने ठार मारले. आणि या पाठीमागे प्रेरणा बनून उभ्या होत्या जिजाऊ.
'जिजाऊ होत्या म्हणून शिवराय घडले,
शिवराय होते म्हणून स्वराज्य घडले,
स्वराज्य घडले म्हणून नंदनवन काय हे कळले,
अहो पण हे सर्व जिजाऊ मुळेच घडले'
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात स्वाभिमान आणि स्वातंत्र्य रुजवले, ज्या माऊलीने विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषास जन्मास घालून त्यांच्यात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज पेरून स्वराज्याची पेरणी केली त्या माऊली म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब…यांचा आज जन्मदिवस.
राजमाता जिजाऊसाहेबांनी शिवबांना अंगाखांदयावर लहानाचा मोठा करताना, सह्याद्रीच्या कुशीत निर्भयपणे वावरायला, शिकवताना महाभारत आणि रामायणातील 'राम आणि कृष्णांच्या' गोष्टींचे बोधामृत पाजताना स्वराज्यस्थापनेचे बाळकडू पाजले. तोरणा गडावर स्वराज्याचे तोरण बांधल्यावर, रायरेश्वराच्या प्रतिज्ञेने या नव्या युगाचा उदय घडवून आणायला प्रेरक ठरल्या त्या एकमेव जिजाऊ माँसाहेब!
पारतंत्र्याची जाणीव झाली
जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये 12 जानेवारी 1598 साली झाला. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. चार भावांची ही लाडकी बहीण नक्षत्रासारखी सुंदर, बोलकी, बाणेदार व चुणचुणीत होती. खेळण्या-बागडण्याच्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लखुजी जाधव सिंदखेडराजाचे जहागीरदार व सत्तावीस महालाचे सरदार होते. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे जिजाऊ लहानपणापासूनच ऐकत आल्या होत्या. वाढत्या वयासोबतच त्यांना पारतंत्र्याची जाणीव होऊ लागली आणि लाचारी व फितुरीचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.
छत्रपतींचा जन्म झाला
डिसेंबर इ.स. 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. राजमाता जिजाऊ यांना एकूण 6 अपत्ये होती. त्यापैकी 4 दगावली व 2 मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले. एका ‘मातीच्या गोळ्याला’ युगकर्त्या राजाच्या रूपाचा आकार देऊन घडवणारी माता होती जिजाबाई आणि तो युगकर्ता होता राजा शिवाजी.
पुनरुत्थानाचे बीज पेरले
जिजाबाईंची देवावर नितांत श्रद्धा होती. त्या दररोज देवदर्शनास जात तेव्हा त्यांच्यासोबत शिवरायही असे. देवळातल्या भग्न मूर्ती, तोडफोड दाखवून त्या शिवरायांच्या मनात त्यांचे पुनरुत्थान करण्याचे बीज पेरत. त्याच वेळी हा अन्याय, विध्वंस करणाऱ्या यवनांविषयी त्या शिवबांना माहिती सांगायच्या. ते ऐकून शिवबा क्रोधीत व्हायचे. आईने सांगितलेल्या रामायण, महाभारतातल्या कथा ऐकून त्यांच्यातही स्फुरण चढायचे. केव्हा एकदा मीपण पापी, अन्यायी, लोकांना शासन करतो, हाती तलवार घेऊन शत्रूशी लढतो, त्यांचा नि:पात करून प्रजेला संरक्षण देतो अशी त्यांची मन:स्थिती व्हायची.
सुराज्य निर्माण करा
हे सर्व करण्याकरिता आवश्यक असलेले युद्धकौशल्य तलवार, दांडपट्टा, भाला, धनुष्यबाण, लक्ष्यवेध, कुस्ती याचे शिवबाचे शिक्षण जिजाईने सुरू केले. तसेच शिवबास लिहिणे, वाचणे, अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा, गडकिल्ले चढणे इत्यादींतही पारंगत केले. शिवबांसाठी आई हेच परमदैवत हाते. तेच त्याचे विश्व होते. त्याचवेळी त्याला ‘‘आपल्या आजोबा व वडिलांसारखा तू पराक्रमी हो; पण तो हिंदवी स्वराज्य स्थापण्यासाठी व सुलतानी सत्ता नामशेष करून स्वराज्य व सुराज्य निर्माण करण्यासाठी,’ असे सांगत असे.
स्वराज्य स्थापनेचा संकल्प
शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रोहिरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य, सुराज्य स्थापनेचा संकल्प केला आणि या सर्व सवंगड्यांनी एकमेकांना कधीच अंतर न देण्याच्या शपथाही तेथेच घेतल्या. जिजाबाईंच्या स्वातंत्र्याच्या गर्भसंस्काराचे, बालसंगोपन, पालकत्वाचे मूळ परिपक्व होते. आज त्याचे रोप प्रकटले होते. तिच्या महत्त्वाकांक्षेच्या परिपूर्तीकडे जाण्यास उचललेले हे शिवबाचे ‘पहिले पाऊल’ होते.
राजे शहाजी मरण पावले
1664 साली शिकार करताना घोड्यावरून पडल्याने राजे शहाजी मरण पावले. त्यावेळी राजमाता जिजाबाई 67 वर्षांच्या होत्या. वृद्धपकाळात वैधव्याचा आघात त्यांची जगण्याची उमेद नाहीशी करणारा होता. त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला; पण राजे शिवाजी यांनी माँसाहेब, असे करू नका, म्हणून विनवणी करत आमचा पुरुषार्थ आणि हिंदवी स्वराज्याच्या राजाचा राज्याभिषेक आम्ही कोणास कौतुके दाखवावा? असाप्रश्न त्यांना केला. राजमातेचे अंत:करण द्रवले. त्यांनी सती जाण्याचे रद्द केले.
राज्याभिषेक व्हावा
शिवाजी महाराज आता खरोखरचे शूरवीर, योद्धे, लढवय्ये, खंबीर झाले होते. त्यांचा पराक्रम अथांग होता. मनात गोरगरिबांची कणव होती. त्यांनी हिंदवी स्वराज्य प्रस्थापित केले होते. असा आपला इतिहास घडवणारा पुत्र महाराष्ट्राचा राजा व्हावा, त्याचा ‘राजा’ म्हणून राज्याभिषेक व्हावा ही अंतरीची इच्छा जिजाबाईंनी शिवरायांना बोलून दाखविली.
जिजाऊंनी डोळे मिटले
आपल्या वृद्ध आणि थकलेल्या मातेची ही इच्छा शिवबाने पूर्ण केली. ‘‘गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंतस श्री शिवछत्रपती सिंहासनाधीश्वर शिवाजी महाराज ह्यांचा विजय असो’’ या जयजयकारात रायगडावर हा सोहळा संपन्न झाला. 6 जून 1674 रोजी राजमातेचे स्वप्न पूर्ण झाले आणि कृतकृत्य झालेल्या या राष्ट्रमातेने त्यानंतर अकरा दिवसांनी म्हणजे 17 जून, 1674 बुधवारी मध्यरात्री शिवबाकडे अतीव समाधानाने बघत आपली यात्रा संपविली. कल्याणकारी राजा घडवणारी माऊली अनंतात विलीन झाली.
आपल्या मनातील हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन, पराक्रम अशा सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ खरोखरच एक आदर्श माता होत्या. राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
COMMENTS