जिल्हा समिती बरखास्त झाल्याने पर्याय निवडण्यास मोकळे अहमदनगर | नगर सह्याद्री अगोदरच जिल्ह्यात घायकुतीला आलेल्या काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर...
जिल्हा समिती बरखास्त झाल्याने पर्याय निवडण्यास मोकळे
अगोदरच जिल्ह्यात घायकुतीला आलेल्या काँग्रेसमध्ये नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने मोठी पडझड झाली. हे कमी होते म्हणून की काय, प्रदेश काँग्रेसने जिल्हा काँग्रेस समितीही बरखास्त करून टाकली. जिल्हा काँग्रेसची बरखास्ती याचा अर्थ थेट माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धक्का देणे मानले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसचे पुढील पदाधिकारी कोणाच्या सल्ल्याने नियुक्ती होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यात पूर्वी थोरात आणि विखे असे काँग्रेसचे दोन गट होते. मात्र विखे भाजपमध्ये गेल्यानंतर संपूर्ण काँग्रेसवर थोरात यांचे एकहाती वर्चस्व आले. पक्षात विखे यांना मानणार्या पदाधिकार्यांना दूर करत थोरात यांनी जिल्हा काँग्रेसवर मजबूत ताबा घेतला. असले असले तरी मध्यंतरी अडीच वर्षाच्या सरकारमध्ये थोरात मंत्री असले तरी काँग्रेसची जिल्ह्यातील तब्येत मात्र सुधारलेली नव्हती. पदाधिकारी काँग्रेस कमी आणि थोरात समर्थक म्हणून जास्त काम करत होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेले बाळासाहेब साळुंके हे थोरात यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ते जे बोलतात ते थोरात यांचे मत असते, असे मानले जाते. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी काँग्रेसऐवजी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे काँग्रेसला गळती लागली होती. मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना निलंबित केल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा चेहराच संपला होता. वर्चस्व थोरात यांचे असले तरी संपूर्ण कारभार आ. डॉ. तांबे हेच पहात होते. जिल्ह्यात त्यांच्याशीच कार्यकर्त्यांचा संपर्क होता. मात्र अगोदर त्यांना आणि नंतर सत्यजित यांना पक्षातून काढण्यात आले. तांबे यांना पाठिंबा दर्शविणारे जिल्हाध्यक्ष साळुंके यांना निलंबित करतानाच जिल्हा काँग्रेस समितीही आता बरखास्त करण्यात आली आहे. सध्या काँग्रेसमध्ये असलेले नेते, कार्यकर्ते बोटावर मोजता येतील एवढा अपवाद वगळला तर ते देखील थोरात यांचेच समर्थक आहेत. ठाकरे शिवसेनेने पुरस्कृत केलेल्या शुभांगी पाटील यांच्यासोबत ते शरीराने असले तरी मनाने तांबे यांच्यासोबतच आहेत, असे खासगीत काँग्रेस नेते सांगतात. अशा प्रकारे जिल्ह्यात पुर्णतः घायकुतीला आलेली काँग्रेस समितीवर बरखास्तीची कारवाई झाल्यामुळे काँग्रेसमधील नेते, कार्यकर्त्यांना आता बंधनेच उरली नाहीत. यापूर्वी तोंडदेखले का होईना शुभांगी पाटील यांच्यासाठी काम करणारे शेवटच्या दिवशी उघडपणे तांबे यांच्यासाठी फिरू लागले नाही, तरच नवल म्हणावे लागेल.
COMMENTS