मुंबई । नगर सह्याद्री - महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. म...
मुंबई । नगर सह्याद्री -
महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये चढउतार सुरू आहे. हा हवामान बदलाचा फटका असल्याचे तज्ज्ञ म्हणत आहे.
राज्यात पुढच्या आठवड्यात अजून जास्त वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. साधरणतः 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीची लाट येणार आहे. येणाऱ्या काळात जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.
मध्य, पूर्व, उत्तर-पश्चिम भारतात वाऱ्यांनी दिशा बदलली आहे. ढगांच्या हालचाली वाढल्यात. त्यामुळे तापमानात वाढ झाली होती. मात्र, आता या ठिकाणी अनेक भागात बर्फवृष्टी होणार आहे. त्यामुळे उद्यापासून तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. 29 ते 30 जानेवारी दरम्यान बर्फवृष्टी वाढण्याची शक्यता. त्यामुळे महिन्याच्या शेवटी तापमान अजून खाली येण्याचा अंदाज आहे.
उत्तरेत सलग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात बदल होत असून गुरुवारी मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी मराठवाड्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बहुतांश भागात हरभरा व गव्हाचे पीक मध्यावर आले असतानाच अवकाळी पाऊस होतोय. यामुळे कांदा पिकावर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील नगर,नेवासे, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
COMMENTS