मुंबई | वृत्तसंस्था काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर राज्यात थेट सत्तां...
काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर राज्यात थेट सत्तांतर झालं होतं. आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होईल, असे संकेत भाजपच्या नेत्यानं दिले आहेत. आगामी संभाव्य महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकारणाची दिशा काय असेल याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
येत्या काही दिवसांत भाजपमध्ये अनेक बडे नेते येणार आहेत. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष रिकामे होतील. शिवसेनेचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. भाजपमध्येही येणार्यांमध्ये मोठमोठी नावे आहेत. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाबादमध्ये सांगितले.
मोठा धक्का बसेल असे प्रवेश होतील असा दावाही बावनकुळे यांनी केला. लातूरहून अमित देशमुख हे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा होती. त्याबाबत बोलताना बावनकुळे यांनी हे विधान केले आहे.
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याबाबतही बावनकुळे यांनी सविस्तर माहिती दिली. दुसरीकडे शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यावरही बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिंदे गट नाराज असल्याचा प्रश्न नाही, मी रोज एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करत आहे. सगळ्यांशी बोलूनच उमेदवाराचं नाव फायनल होत आहे. धुसफुस आमच्यात नाही, तर महाविकास आघाडीत आहे. नाना पटोले त्यांच्या लोकांना घेऊन नागपुरात बसले आहेत, ते भांडत आहेत, पण आमच्यात पूर्ण समन्वय आहे, असे ते म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद जाणार की राहणार हे निवडणूक आयोग ठरवेल, असेही ते म्हणाले.
COMMENTS