शुभांगी पाटलांची वातावरण निर्मिती मतदानात उतरेल का? । विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा सत्यजित तांबे यांनी पहिल्या फेरीतच मिळवल्यास आश्चर्य नक...
शुभांगी पाटलांची वातावरण निर्मिती मतदानात उतरेल का? । विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा सत्यजित तांबे यांनी पहिल्या फेरीतच मिळवल्यास आश्चर्य नको
सारीपाट / शिवाजी शिर्के -
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान उठवून देखील विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होण्याची जास्त शक्यता आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या सत्यजित तांबे यांनी या मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून खेळलेली चाल आणि त्यांना मिळत गेलेला निर्णायक पाठींबा त्यांची जमेची बाजू ठरल्या! नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार नोंदणी केलेली असतानाही त्यांनी नगरमध्ये शेवटच्या दोन दिवस लक्ष घातले. भाजपाकडून शेवटच्या टप्प्यात पाठींब्याचे संकेत दिले असले, तरी पहिल्या दिवसापासूनच तो गृहित धरण्यात आला होता. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना नेतेमंडळींचा पाठींबा मिळत असताना दुसरीकडे प्रत्यक्षात मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. डॉ. सुधीर तांबे यांनी या मतदारसंघातून तीनवेळा प्रतिनिधीत्व करताना मतदारांशी थेट ठेवलेला संपर्क आणि त्यातून त्यांनी मिळवलेली या मतदारसंघावरील पकड सत्यजित तांबे यांना पूरक ठरली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच विजयासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा सत्यजित तांबे यांना मिळाला तर फारसे आश्चर्य वाटायला नको.
विधान परिषदेसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पक्षाचा एबी फॉर्म देखील दिला होता. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असे जाहीर केल्यानंतर दुसर्या दिवशी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केलाच नाही. उलटपक्षी सत्यजितचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अत्यंत पद्धतशिरपणे ही खेळी त्यांनी खेळली आणि काँग्रेसला दगाफटका झाला. यानंतर महाविकास आघाडीत मोठी खळब़ळ उडाली. शेवटच्या क्षणी शुभांगी पाटील यांना पुरस्कृत करण्याची नामुष्की महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आली. त्यातही काँग्रेसची जागा असतानाही उद्धव ठाकरे शिवसेनेने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराच्या मागे फिरण्याची वेळ काँग्रेसवर आली. तांबे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते एकत्र येतील आणि त्यांना पराभूत करण्याचा चंग बांधतील, असे वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वगळता अन्य कोणीही सत्यजित तांबे यांच्या विरोधात संपूर्ण मतदारसंघात आक्रमक झालेले दिसले नाही.
पदवीधर मतदारसंघातून 2009 पासून सातत्याने डॉ. सुधीर तांबे निवडून येत आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये मोदी लाट असतानाही डॉ. तांबे यांनी या मतदारसंघात मताधिक्याने विजय मिळवला होता. सलग तीनवेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने डॉ. तांबे यांचा विविध शिक्षक संघटना, त्यांचे पदाधिकारी, पदवीधर अशा सार्यांशीच थेट संपर्क आला. खरंतर या मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच मतदार नोंदणी अभियान तांबे यांनी हाती घेतले. त्यातूनच एकट्या नगर जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त मतदार नोंदणी करण्यात ते यशस्वी झाले. सत्यजित तांबे हीच मोठी जमेची बाजू असणार आहे.
महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर आंदोलन केलं आहे. तसंच त्यांनी नाशिकमध्ये 29 हजार पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे. तसंच धुळे व जळगाव येथेही त्यांना पाठिंबा आहे. त्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनेही त्यांना तिकीट द्यायचे निश्चित केले होते, पण ऐन वेळेपर्यंत त्यांच्या नावाचा एबी फॉर्म आला नाही.
त्यानंतर पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यानंतरही भाजपने त्यांच्याऐवजी तांबे यांना पाठिंबा जाहीर केला. सत्यजीत तांबे यांचं सामाजिक कामातील योगदान मोठं असून तांबे यांनी एकट्या नगर जिल्ह्यात लाखांपेक्षा जास्त मतदार नोंदणी केली आहे. त्याशिवाय काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना आहे. सत्यजीत गेली अनेक वर्षं राजकारण आणि समाजकारण या दोहोच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत. त्यांनी तरुणांना जिव्हाळा असलेल्या बेरोजगारी, वेतनवाढ, शिक्षणाच्या संधी अशा अनेक प्रश्नांना विविध मंचांवरून वाचा फोडली. लॉकडाऊनच्या काळात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना दिलासा देत त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं कामही केले. ज्येष्ठ नेते आणि सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात हे खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या निवडणुकीत थोरात यांची भूमिका शेवटपर्यंत पुढे आली नाही हे विशेष! भाच्याच्या बंडाला मामाचा छुपा पाठींबा तर नाही ना अशी चर्चा मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार आहे. प्रचाराच्या एकूणच कालावधीत तांबे यांची यंत्रणा पूर्णपणे काम करत होती. समाजातील विविध घटकांना, सामाजिक संघटना, राजकीय संघटना, विविध पदाधिकारी, डॉक्टर, वकिल यांच्या संघटना आणि त्यांचे पदाधिकारी यांच्याशी डॉ. तांबे जसे संपर्कात होते तसेच सत्यजित तांबे हे देखील संपर्कात राहिले.
नगरसह नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार असा पाच जिल्ह्यांचा समावेश असणारा पदावीधर मतदारसंघ पिंजून काढणे अत्यंत कठीण! मात्र, सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या पहिल्या दिवसापासून हा मतदारसंघ पायाला भिंगरी बांधल्यागत पिंजून काढला. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये सत्यजित तांबे यांचे वेगळे वलय राहिले. त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना फारसे अंगावर न घेता, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे टाळत सत्यजित तांबे यांनी ही निवडणूक एकहाती हातात ठेवली. शुभांगी पाटील यांनी वातावरण निर्मिती केली असली तरी त्याचे रुपांतर मतदानात होईलच याची खात्री कोणीही द्यायला तयार नाही. या मतदारसंघातील अन्य उमेदवारांनी त्यांच्या कुवतीनुसार मतदारांना आवाहन केले आणि आपली भूमिकाही मांडली. मात्र, या सार्यांमध्ये उजवे ठरले ते सत्यजित तांबे!
भाजपाच्या पाठिंब्याचे संकेत शेवटच्या क्षणी मिळाले. मात्र, हे संकेत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच मिळाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत धूर्त चाल खेळली. या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी बाळासाहेब थोरात यांची मोठी कोंडी करून टाकली. तांबे यांच्या उमेदवारीने थोरात यांचे पक्षांतर्गत विरोधक एकवटले. नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे थोरातांवर निशाणा साधला. काँग्रेस पक्षात हे सारे होत असताना दुसरीकडे यावर बाळासाहेब थोरात यांनी ब्र शब्द देखील काढला नाही. तांबे यांच्या बंडाबद्दल देखील ते काहीच बोलले नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर बरीच उलथापालथ होऊ शकते. एक लाखापेक्षा जास्त मतदार नोंदणी नगर जिल्ह्यात आहे. त्यातही संगमनेर तालुक्यात सर्वाधिक मतदार नोंदणी आहे. नगर जिल्ह्यात आणि संगमनेर तालुक्यात तांबे यांना मताधिक्य मिळणार यात शंकाच नाही. नव्हे या मतमोजणीतच तांबे विजयासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा पूर्ण करतील आणि त्यांना विजयी घोषीत केले जाऊ शकते. मात्र, असे झाले तर मग बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेस नेत्यांसह महाविकास आघाडीत मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भाचा (सत्यजित) आमदार होत असताना मामाला (बाळासाहेब थोरात) बर्याच राजकीय संकटांना सामोरे जावे लागले नाही म्हणजे झालं!
COMMENTS