सुहास देशपांडे । नगर सह्याद्री उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून राज्यभर चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविक...
सुहास देशपांडे । नगर सह्याद्री
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून राज्यभर चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीची ऐशीतैशी झालेली दिसून येत आहे. काँग्रेसचे बंडखोर असलेले सत्यजित तांबे यांना भाजपसोबतच राष्ट्रवादीने पूर्ण सहकार्य दिल्याचे मतदानाच्या दिवशी आढळून आले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर करूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्या ऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. या प्रकाराने काँग्रेसची पुरती नाचक्की झाली. या धक्क्यातून काँग्रेस मतदानाच्या दिवसापर्यंत सावरू शकली नाही. सुरूवातीला डॉ. तांबे यांना आणि नंतर सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. या कारवाया होऊनही जिल्ह्यातील नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थक तांबे यांना पाठिंबा असल्याचे जाहीरपणे सांगत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनीही जाहीरपणे तांबे यांची बाजू घेतली. असे केल्यास पक्षातून आपल्यावर कारवाई होईल, याची माहिती असूनही त्यांनी हे धाडस केले. असे असले तरी एरवी तांबे यांच्या आशिर्वादाने पदे उपभोगणार्या काही पदाधिकार्यांनी मात्र शेवटपर्यंत पक्षाशी प्रामाणिक असल्याचे दर्शविले. तांबे यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरूवातीपासूनच होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील वारंवार हेच सांगत होते. मात्र भाजप जाहीरपणे पाठिंबा असल्याचे सांगत नव्हता. मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांनी अधिकृतपणे तांबे यांना पाठिंबा जाहीर केला नाही, मात्र त्यांना मदत करण्याचे निरोप देण्यात आले. मतदानाच्या आदल्या दिवसापासून मतदारसंघात बहुतांश ठिकाणी भाजपने उघडपणे तांबे यांच्यासाठी काम केले. काँग्रेसमधून फारकत घेतल्याने आणि यास भाजपच कारणीभूत असल्याने निवडणुकीत भाजपने तांबे यांच्यासाठी मदत करणे क्रमप्राप्तच होते. मात्र महाविकास आघाडीतही फूट निदर्शनास आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
काँग्रेसकडे गेली अनेक वर्ष असलेला हा मतदारसंघ ऐनवेळी काँग्रेसला ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे द्यावा लागला. ठाकरे गटाने यासाठी भाजपमधून उमेदवारी न मिळालेल्या शुभांगी पाटील यांना पुरस्कृत केले. त्याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे जाहीरही केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सातत्याने पाटील याच मविआच्या उमेदवार असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रचारासाठी पटोले यांनी नगर जिल्ह्यात पायधूळही झाडली. मात्र महाविकास आघाडीतील प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादीने या सर्वच बाबींवर चुप्पी साधली होती. राष्ट्रवादीचे काही आमदार कार्यकर्त्यांना तांबे यांचे काम करण्याचे सांगत होते. मतदानाच्या दोन दिवस अगोदर तर नगरसह काही ठिकाणी राष्ट्रवादीने उघडपणे तांबे यांचे काम करण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पातळीवरूनच तसे आदेश असल्याचे सांगण्यात आले. ‘भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात महाविकास आघाडी भक्कम आहे’ अशा कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी राज्यात चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत ऐशीतैशी झाल्याचेच यामुळे समोर आले.
COMMENTS