काँग्रेस नेत्यांना ग्राऊंडवची परिस्थिती माहिती नसल्याचा टोला नाशिक । नगर सह्याद्री गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थ...
काँग्रेस नेत्यांना ग्राऊंडवची परिस्थिती माहिती नसल्याचा टोला
नाशिक । नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार सध्या रंगतदार अवस्थेत आहे. काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यासाठी आलेल्या सत्यजीत तांबे यांनी निवडून येण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी सत्यजीत तांबे सोमवारी नाशिकमध्ये प्रचाराला आले होते. यावेळी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी नाकारणार्या आणि निवडणुकीत पाठिंबा काढून घेणार्या काँग्रेसच्या नेत्यांवर खरमरीत शब्दांत टीका केली. माझ्या बाजूने कोणीही उभं नाही, असे कोण म्हणत आहे? नाशिकमधील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. इकडे पक्ष वगैरे काही नाही. अगदी शिवसेनेचे कार्यकर्तेही माझ्यासोबत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना ग्राऊंडवरची परिस्थिती काय आहे, ते माहिती नाही, हे माझे स्पष्ट मत असल्याचे सत्यजीत तांबे यांनी म्हटले. यावर आता काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी 2023 ला मतदान होणार आहे. तर, 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. यामध्ये तांबे पितापुत्रांनी शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्षाला धक्का दिल्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीसाठी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती.
मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून ऐनवेळी माघार घेतली होती. त्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर सत्यजीत तांबे यांनी भाजपसह अन्य राजकीय पक्षांकडे पाठिंबा मागितला होता. तांबे पितापुत्रांच्या या खेळीने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला होता. यानंतर काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांना तात्पुरत्या कालावधीसाठी तर सत्यजीत तांबे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे सत्यजीत तांबे भाजपच्या आणखी जवळ गेल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसांमध्ये भाजपकडून सत्यजीत तांबे यांना उघडपणे पाठिंबा दिला जाणार का, हे पाहावे लागेल.
COMMENTS