देवेंद्र फडणवीसांनी थोरातांना त्यांच्याच घरात केले चेकमेट । काँग्रेस पक्षाचा गेम सुधीर तांबे यांनीच वाजवला! सारीपाट / शिवाजी शिर्के - का...
देवेंद्र फडणवीसांनी थोरातांना त्यांच्याच घरात केले चेकमेट । काँग्रेस पक्षाचा गेम सुधीर तांबे यांनीच वाजवला!
सारीपाट / शिवाजी शिर्के -
काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांना सत्यजित तांबे यांच्या राजकीय खेळीने सर्वाधिक वेदना झाल्या असणार! बहिण असणार्या दुर्गाताईंनी सत्यजित याच्या हट्टापायी भावालाही वेदना दिल्या. खरं तर पदवीधरच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चाणाक्षपणे चाल खेळली. बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच भाच्याकडून क्लिनबोल्ड करण्यात ते यशस्वी झाले. खरं तर सत्यजित तांबे यांनी एकट्या बाळासाहेब थोरात यांना ‘मामा’ बनवले नाही तर सार्यांनाच मामा बनवले! काँग्रेस पक्षाचा सर्वाधिक गेम कोणी वाजविला असेल तर तो डॉ. सुधीर तांबे यांनी! पक्षतील सार्यांनाच बेसावध ठेवत सुधीर तांबे यांनी पुत्रप्रेम किती आंधळे असते हे दाखवून दिले.
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षश्रेष्ठींसह दस्तुरखुद्द बाळासाहेब थोरात यांना खर्या अर्थाने मामा बनविण्यात सत्यजित तांबे हे यशस्वी झाले. बाळासाहेब थोरात यांच्यासह डॉ. सुधीर तांबे यांना हात टेकवायला लावण्याची सत्यजित तांबे यांची ही पहिली वेळ नाहीय! राजकीय महत्वकांक्षा बाळगून राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी याआधी जिल्हा परिषदेत दोन्ही वेळा प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे साकुर आणि घुलेवाडी या गटातून उमेदवारी केली आणि ते निवडूनही आले. मात्र, या दोन्ही गटातून त्यांना बंडाची भाषा बोलूनच उमेदवारी मिळाली. आताही त्यांनी जे काही केले ते त्याचाच एक भाग! विधानसभेत जायची प्रचंड महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या सत्यजित तांबे यांनी नगर शहरातून उमेदवारी केली. मात्र, त्यात यशस्वी झाले नाही. बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमधून त्यांच्या कन्येला पुढे केले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी सत्यजित तांबे यांची आधीच जवळीक वाढली होती. मुंबईतील पुस्तक प्रकाशन समारंभ हे वरकरणी दिसणारे निमित्त होते.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार सत्यजित असणार हे बोलले जात होते. काँग्रेस नेत्यांनाही सत्यजित तांबे यांच्या हालचालींची माहिती होते. अर्थातच ही माहिती बाळासाहेब थोरात यांना नसणार यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच डॉ. सुधीर तांबे यांनी या मतदारसंघात संपर्क वाढविलेला होता. निवडणूक जाहीर झाल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांची देहबोली बदललेली होती. या मतदारसंघातून आपण निवडणूक लढविणार असा निर्वाणीचा निर्णय सत्यजित तांबे यांनी वडील असणार्या डॉक्टरांना दिला. भाजपाकडून आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. सत्यजित तांबे यांच्या या निर्णयाला त्यांच्या मातोश्री दुर्गाताई यांचा पाठींबा मिळाला. पत्नी आणि बंधूंनीही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. डॉ. सुधीर तांबे यांच्यासमोर धर्मसंकट निर्माण झाले. सत्यजित तांबे यांचा हा निर्णय डॉ. तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांना सांगितला नसेल यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. कदाचित यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच बाळासाहेब थोरात ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले नसावे ना, असाही प्रश्न चर्चेत आला आहे. उमेदवारी जाहीर होईपर्यंत आणि एबी फॉर्म हातात पडण्याच्या आधीपासूनच डॉ. तांबे यांना आपल्या घरात काय चालले आहे याची जाणिव होती. सलग तीनवेळा काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून डॉ. तांबे यांना संधी दिली. पक्षाशी आपण बेईमानी करत आहोत याची जाणिव असतानाही डॉ. तांबे यांनी अत्यंत सोयीस्करपणे काँग्रेस पक्षाचा गेम वाजविला!
पडद्याआड जे काही चालू आहे याची सर्व जाणिव तांबे यांना होती. उमेदवारी दाखल करण्याच्या आदल्या दिवशी ‘साधेपणाने अर्ज दाखल करणार’, असं ट्वीट करणार्या डॉ. तांबे यांनी थंड डोक्याने हे ट्वीट केले होते, हेही आता उघड झाले आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींना तांबे कुटुंबात काय चालू आहे याची इत्यंभूत माहिती मिळत होती. सत्यजित तांबे यांनी अत्यंत थंड डोक्याने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इशार्याने हा खेळ खेळला. त्यात ते पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेले दिसत आहेत. सत्यजित तांबे यांना आतापर्यंत जिल्हा परिषदेत दोनदा यश मिळाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी थोडक्यात गेली. मात्र, जिल्हा परिषदेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये बाळासाहेब थोरातांना इच्छा नसतानाही सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यावी लागली. यावेळी विधान परिषदेसाठी वडिलांनी या मतदारसंघाची पूर्णपणे मशागत केली होती. डॉक्टर निवडून येणार अशी परिस्थिती असताना पुत्रप्रेमापोटी त्यांना डोळ्यावर पट्टी बांधावी लागली. डॉ. तांबे यांनी स्वत:ची अडचण करून घेतल्याचे दिसत असले तरी त्यांनी खरी अडचण केलीय ती बाळासाहेब थोरात यांची! थोरात यांचे पक्षांतर्गत विरोधक आता सरसावले आहेत. नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी ‘हे सारे ठरवून झालेय’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया देतानाच श्रेष्ठींकडे कारवाईची मागणीही केलीय!
नात्याने मामा-भाचे असणारे बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे हे एकाचवेळी काँग़्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले. युवकांचे मोठे संघटन सत्यजित तांबे यांनी युवक प्रदेशाध्यक्ष असताना उभे केले. प्रचंड बुद्धीमत्ता आणि तितकीच मोठी राजकीय महत्वकांक्षा बाळगून राहिलेल्या सत्यजित तांबे यांच्यासाठी वडिलांना हातात असणारा पक्षाचा एबी फॉर्म ‘वळकुटी’ करून ठेवावा लागला! नव्हे, तो ठरवूनच ठेवला गेला. आता काँग्रेस पक्षनेतृत्व या ‘वळकुटी’ंचा बदला घेणार यात शंकाच नाही. डॉ. तांबे यांना गमवायचे काहीच नाही! पोरगा म्हणजेच सत्यजित याने भाजपाकडून उमेदवारी दाखल केली असती तर बाप-लेकाची लढत झाली असती. सत्यजित ऐकायला तयार नव्हता, हे आता सुधीर तांबे खासगीत सांगत असतील. हे खरे मानले तर मग सत्यजितला काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म मिळवून देणे सुधीर तांबे यांना अवघड नव्हते. सत्यजित तांबे यांचा दिल्लीश्वराशी थेट संपर्कच नसून वजनही आहे. मग, असे असताना सुधीर तांबे यांनी सर्वांनाच गाफील का ठेवले? सत्यजित तांबे हे आपण काँग्रेस अन् महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याचे सांगत असले तरी त्यात काहीच तथ्य नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी कोणत्याही हालचाली न करणे यातच सारे आले.
भाच्याने (सत्यजित) अपक्ष उमेदवारी दाखल करताना मी काँग्रेसचाच उमेदवार असून आपल्याला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, मी भाजपालाही पाठिंबा मागणार आहे असं विधान करताना मामाची (बाळासाहेब थोरात) विशेष काळजी घेतल्याचे दिसते. मामाला कोणतीही अडचण नको असं कदाचित भाच्याला वाटलं असावं! आता विधान परिषदेत जाण्याची औपचारीकता बाकी असली तरी सत्यजित तांबे यांच्या खेळीने ‘मामा’ची विकेट उडाली नाही म्हणजे भाच्यानं कमवलं!
जिल्हा परिषद निवडणुकीत भांडून उमेदवारी मिळविणार्या सत्यजित तांबे यांनी यावेळी विधानभवनात जाण्यासाठी थेट मामालाच आणि काँग्रेस नेतृत्वालाही ‘मामा’ बनवले! खरंतर ‘असा’ भाचा कोणालाही मिळणार नाही. काँग्रेस पक्ष आणि बाळासाहेब थोरात यांच्या नशिबी असा भाचा होता. आता हा भाचा देवेंद्रजींच्या गोटात दाखल झाल्यात जमा आहे. पदवीधरांचे प्रश्न मांडणारा भाचा बाळासाहेबांना सभागृहात दिसणार आहे. सुधीर तांबे आणि दुर्गा तांबे यांना मुलगा आमदार झाल्याचे पाहायला मिळणार आहे. मात्र, त्याच्याच जोडीने आपण काँग्रेस पक्ष नेतृत्वाचा कसा घात केला याची सल शेवटपर्यंत डॉक्टर असणार्या सुधीर तांबे यांना राहणार हे नक्की!
COMMENTS