नवी दिल्ली / वृत्तसंस्था- महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज (10 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था-
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज (10 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे.
शिवाय सर्व पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार ठाकरे गट आणि शिंदे गट आपली बाजू मांडणार आहेत. तर दुसरीकडे निवडणूक आयोगात शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोनही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडील प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती. त्यानुसार 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. तर केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे.
या सर्व घटनात्मक मुद्द्यासंदर्भात सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एक वेळापत्रक ठरवून देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची केस 7 घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. नबाम रेबीया केसमध्ये 5 न्यायाधीश होते. त्यामुळं 5 सदस्यीय घटनापीठ या संदर्भात निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी मतदार आणि नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या घटनातज्ज्ञ असिम सरोदे यांनी देखील गेल्या सुनावणीत केली होती.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची केस 7 सदस्यीय घटनापीठाकडे सोपवली जाण्याची मागणी केली जात आहे. अरुणाचलमध्ये 2016 ला राज्यपालांनी त्या ठिकाणचे कॉंग्रेसचे सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लावली होती. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय देताना 13 जुलै 2016 ला अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा पुनर्स्थापित करण्याचा आदेश दिला होता. आणि राज्यपालांचं कृत्य अवैध ठरवलं होतं.
महाराष्ट्राच्या प्रकरणामध्ये देखील महाराष्ट्राच्या राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. तसा उल्लेख महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत वारंवार करण्यात आला आहे. त्यामुळं नबाम रेबिया केसला अनुसरून जर महाराष्ट्रातील राज्यपालांच्या निर्णयासंदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर नबाम रबिया प्रकरणात निर्णय देणाऱ्या 5 सदस्यीय घटनापीठापेक्षा मोठे घटनात्मकपीठ असायला हवे. अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीने गेल्या सुनावणीत केली होती.
आजच्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण क्रमांक दोनला आहे. त्यातच आज निवडणुक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. सत्तासंघर्षाप्रकरणी आज एकाचवेळी सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात महत्वाचा दिवस आहे. निवडणूक आयोगात आत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी कागदपत्रं सादर झालेली आहेत. आता प्रत्यक्ष सुनावणीला, युक्तीवादांना सुरुवात कधी होतेय याचं उत्तर आयोगात मिळेल. धनुष्यबाण कुणाचा याचं उत्तर याच आयोगाच्या लढाईतून मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा असेल यात शंका नाही. सुप्रीम कोर्टातलं प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे गेलं तर त्याचा परिणाम ही केस लांबण्यातही होण्याची शक्यता आहे.
COMMENTS