मुंबईतील वांद्रे परिसरातील माउंट मेरी चर्चला उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईतील वांद्रे परिसरातील माउंट मेरी चर्चला उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी कलम ५०५(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणारा मेल पाठवल्यानंतर आरोपीला कोलकाता येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी आयपी ऍड्रेस ट्रॅक करून आरोपीचे लोकेशन ट्रेस केले आणि त्याला अटक केली. ३० डिसेंबर रोजी वांद्रे येथील माऊंट मेरी चर्चला लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला होता, ईमेल पाठवण्यामागील आरोपीचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
पहिल्या ईमेलनंतर आणखी एक ईमेल प्राप्त झाला जिथे आरोपीच्या पहिला धमकीचा ईमेल पाठवलेल्या मुलाची आई असल्याचा दावा केला होता. "त्यात त्याच्या आईने माफी मागितली की, तिचा मुलगा मानसिकदृष्ट्या आजारी आहे म्हणून त्याने असा संदेश पाठवला," अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
दुसऱ्या एका घटनेत, मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री २९ डिसेंबर रोजी एक फोन आला की मुंबईत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला स्फोट होणार आहेत. फोन करणार्याने स्वतःची ओळख उत्तर प्रदेशातील अझहर हुसेन अशी दिली आणि त्याच्याकडे शस्त्रे आणि आरडीएक्स असल्याचे त्याने सांगितले.
कॉलवर कारवाई करत आझाद मैदान पोलिस स्टेशनच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला आणि कॉल करणाऱ्याला अटक केली. नंतर हा कॉल फसवा असल्याचे पोलिसांना समजले. नरेंद्र कावळे असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याने मद्यधुंद अवस्थेत फोन केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
COMMENTS