पुणे | नगर सह्याद्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. तुम्हाला जर हा द्रोह ...
पुणे | नगर सह्याद्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. तुम्हाला जर हा द्रोह वाटत असेल तर गुन्हा दाखल करा. पण हा गुन्हा नियमात बसतो का? असा सवाल करत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आम्ही छत्रपतींच्या विचारांसोबत द्रोह करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असे विधान केले होते. अजित पवार यांच्या या विधानावरुन भाजपकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधी पक्षनेते पवारांवर निशाणा साधला. आता अजित पवारांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे.
विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, पूर्वीपासून आम्ही पुरोगामी विचार मांडणारी लोक आहोत. कारण नसताना काही राजकीय पक्ष वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात. महापुरुषांच्या विचारांना धक्का न लावता पुढे जावे असा आमच्या सर्वांचा प्रयत्न असतो. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मी जी भूमिका मांडली ती सगळ्यांनाच पटली पाहिजे असे काही नाही. पण मी मांडलेली भूमिका चूकीची आहे हे ठरवणारे कोण? असा सवाल अजित पवार यांनी विचारला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदू उरलेच नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. त्यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
COMMENTS