हवामान विभागाचा अंदाज मुंबई / नगर सह्याद्री - पुढील 24 तास राज्यात ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, मध्य महार...
हवामान विभागाचा अंदाज
मुंबई / नगर सह्याद्री -
पुढील 24 तास राज्यात ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अवकाळी पावसाचा तडाखा
अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने मंगळवारी जालना, औरंगाबाद, नाशिक, नगर जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ज्वारी, मका व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वातावरणात अचानक बदल होऊन जालना, औरंगाबाद, नाशिक, नगर जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी मंगळवारी अवकाळी पावसाने तडाखा दिला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ज्वारी, मका व गहू आडवा झाला. जालना जिल्ह्यात जानेफळ मिसाळ गावात मंगळवारी रात्री जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे गहू आणि ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे १३.५, कोल्हापूर १८.८, नांदेड १८.८, सातारा १८.२, ठाणे १९, उदगीर १८.५, सोलापूर २०.९, परभणी १७.४, बारामती १६.९, डहाणू १६, जळगाव १६.४, रत्नागिरी १९.८, माथेरान १२.४, जालना १६.६, नाशिक १२.६, औरंगाबाद 13.2 हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य उत्तर प्रदेशापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे. यातच उत्तर अंतर्गत तमिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यात किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे गारठा कमी झाला आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 29 ते 33 अंशांच्या आसपास आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 32.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
COMMENTS