मुंबई नगर सहयाद्री - देशात करोना संसर्गाची दुसरी लाट ही अतिशय धोकादायक मानली जाते. अनेक रुग्णांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला. करोनाचा हा ...
मुंबई नगर सहयाद्री -
देशात करोना संसर्गाची दुसरी लाट ही अतिशय धोकादायक मानली जाते. अनेक रुग्णांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाला. करोनाचा हा संसर्ग तुरुंगांमध्ये पसरत होता आणि वेगाने वाढत होता. यामुळे सरकारने गर्दी असलेल्या तुरुंगामधील कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. पण पॅरोलवर सुटलेले अनेक कैदी अद्याप तुरुंगात परतलेले नाहीत. यामुळे तुरुंग प्रशासन आता त्यांच्या शोधात आहे.
एका वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, ज्यावेळी करोनाचा संसर्ग वाढला होता त्यावेळी तुरुंगातून अनेक कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं होतं. मात्र, आता एक मोठी माहिती समोर आली आहे. बरेच कैदी तुरुंगात परतलेलेच नाहीत. जवळपास ४५१ कैदी पॅरोल संपूनही तुरुंगात परतले नसल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कैद्यांना गेल्या महिन्यात नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनाकडून फरार कैद्यांविरोधात ३५७ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने ज्या तुरुंगांमध्ये क्षमतेहून अधिक कैदी आहेत, अशा कैद्यांना सोडण्यात आलं होतं. यात खटला सुरू असलेल्या आरोपींना आणि ७ वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मार्च २०२० च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तुरुंगात ३५ हजार कैदी होते.
कैद्यांना सोडण्याच्या योजनेनुसार १४, ७८० जणांना तुरुंगातून तात्पुरता सोडलं गेलं होतं. यात ४,२३७ दोषींचा समावेश होता. यांना इमर्जन्सी पॅरोलवर किंवा अंतरिम जामिनावर सोडलं गेलं होतं. कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात येण्यास सांगण्यात आलं होतं. पण अजूनही ४५१ दोषी तुरुंगात परतलेले नाहीत. या प्रकरणी ३५७ एफआयआर दाखल केले गेले आहेत.
अंतरिम जामिनावर, तात्पुरता दिलेल्या पॅरोलवरील कैद्यांनी तुरुंगात परतावं, असा आदेश गेल्या वर्षी ४ मे रोजी गृह विभागाने जारी केला होता. करोना काळात पॅरोलवर किंवा जामिनावर सुटलेल्या कैद्यांना आणि आरोपींना स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची सूचना करण्यात आली होती. ज्यांनी याचे पालन केले नाही त्यांच्याविरोधात कलम २४४ गुन्हा दाखल करण्यास गृह खात्याने सांगितलं होतं.
COMMENTS