एप्रिल महिन्यात तीन दिवसीय शिक्षण परिषद होणार अहमदनगर / नगर सह्याद्री - नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे चर्चेत असलेले युवा नेते सत्य...
एप्रिल महिन्यात तीन दिवसीय शिक्षण परिषद होणार
अहमदनगर / नगर सह्याद्री -
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे चर्चेत असलेले युवा नेते सत्यजीत तांबे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर साधकबाधक चर्चा करण्यासाठी एप्रिल महिन्यात तीन दिवसी शिक्षण परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत शिक्षक, शिक्षक संघटना, शैक्षणिक संस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि सरकारचा शिक्षण विभाग या घटकांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. या परिषदेच्या निमित्ताने केजी टू पीजी शिक्षणासाठीचा पुढील २० वर्षांसाठीचा कृती आराखडा तयार करण्यात येईल. या शिक्षण परिषदेद्वारे राज्यातील सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाची युवा उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
नाशिक शहर येथे पदवीधर, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपर्क साधताना ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील सुधारणांमध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. स्त्रियांसाठीची पहिली शाळा महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी इथे पुण्यातच स्थापन केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचंही या क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे, असं सत्यजीत तांबे म्हणाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याची व्यवस्था केली. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गावागावांमध्ये विविध संस्था उभ्या राहिल्या. १९८३ मध्ये वसंतदादा पाटील यांनीही शिक्षणक्षेत्रात राज्यात क्रांती केली होती. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी वसंतदादांनी खासगी संस्था सुरू करून सर्व स्तरांमधील विद्यार्थ्यांना डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची संधी उपलब्ध करून दिली, यावरही तांबे यांनी प्रकाश टाकला.
या निवडणुकीच्या आधीपासूनच आपला तरुणांशी, शिक्षण क्षेत्राशी, विविध शैक्षणिक संस्थांशी खूप जवळचा संबंध होता. निवडणुकीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अधिक जवळून समजून घेता आले. जगातील अव्वल शंभर विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. हे चित्र खंतावणारं आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी या क्षेत्राला एक नवी दिशा देण्यासाठी ही शिक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याचं तांबे यांनी स्पष्ट केलं.
सध्या शिक्षण क्षेत्रात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, संस्थांना मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानात वाढ करणे, शिक्षणावरील खर्चात लक्षणीय वाढ करणे, पूर्ण वेळ कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची नेमणूक करणे, शालेय प्रशासनात सुधारणा, ITI ना अनुदान देणे, शिक्षकांसाठी अशैक्षणिक कामे बंद करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, असे अनेक निर्णय प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सार्वजनिक व खासगी शिक्षणसंस्था यांचे प्रतिनिधी, तसेच शिक्षणतज्ज्ञ आणि राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी यांना एकत्र आणण्याचं काम ही तीन दिवसीय शिक्षण परिषद करेल, असेही सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे
निवडणुकीतील हार-जीत एका बाजूला असते. पण पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या निमित्ताने मला समजलेल्या प्रश्नांवर तोडगा निघणं मला महत्त्वाचं वाटतं. अनेकांशी बोलल्यानंतर त्यांना माझ्याकडून याबाबत काहीतरी ठोस करण्याच्या अपेक्षा असल्याचं लक्षात आलं. या अपेक्षा मला खोट्या ठरवायच्या नाहीत. तसंच उगाच काहीतरी केल्यासारखंही दाखवायचं नाही. या परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रासाठीचा एक चांगला आराखडा तयार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. हा आराखडा पुढील २० वर्षांसाठीचं शिक्षणविषयक धोरण ठरवण्यासाठी सरकारला उपयुक्त ठरेल, असा विश्वास सत्यजीत यांनी व्यक्त केला.
COMMENTS