नगरमध्ये ’जितो महाट्रेड फेअर 2023’ शानदार समारंभात उद्घाटन अहमदनगर । नगर सह्याद्री जितो महाट्रेड फेअरच्या उपक्रमामुळे बाहेरील गुंतवणुक ...
नगरमध्ये ’जितो महाट्रेड फेअर 2023’ शानदार समारंभात उद्घाटन
अहमदनगर । नगर सह्याद्री
जितो महाट्रेड फेअरच्या उपक्रमामुळे बाहेरील गुंतवणुक नगर जिल्ह्याकडे आकर्षित होऊ शकते. आज आपल्या नगरमधून हजारो तरूण उद्योग, व्यवसाय, नोकरीनिमित्त बाहेर गेले आहेत. जितोच्या माध्यमातून त्यांना नगरमध्ये आणून त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करू. उद्योग वाढीच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. नगर जिल्ह्यात प्रचंड क्षमता आहे. त्याचे व्यवस्थित सादरीकरण जगासमोर झाले तर जिल्ह्याचा विकास शक्य आहे. त्यासाठी जितो सारख्या संघटना आणि सरकार एकत्र काम करेल अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जैन इंटरनॅशनल ट्रेड आर्गनायझेशन (जितो)च्या अहमदनगर शाखेच्यावतीने नगर शहरात दि.25 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत जितो महाट्रेड फेअर 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. नगर-पुणे रोडवरील केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट समोरील तब्बल 10 एकरच्या विस्तीर्ण प्रांगणात हा महाट्रेड फेअर होत आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनानंतर मंत्री विखे पाटील यांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन माहिती घेतली.स्वागत करताना अमित मुथा यांनी सांगितले की, तब्बल तीन वर्षांनंतर नगर शहरात पुन्हा एकदा जितो महाट्रेड फेअर होत आहे. मागील वेळी जो प्रतिसाद मिळाला त्यापेक्षाही अधिकचा अभूतपूर्व प्रतिसाद यावेळी महाट्रेड फेअरला मिळेल असा मला विश्वास आहे. आमच्या संपूर्ण जितो टिमने मागील दोन अडीच महिने प्रचंड मेहनत घेतली आहे. अहमदनगरचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून या प्रयत्नांना आपणा सर्वांचे पाठबळ नेहमीच मिळते.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, जितो अहमदनगरची टिम गेल्या काही वर्षांपासून नगरमध्ये अतिशय सुंदर काम करत आहे. करोना काळातही त्यांनी मोठं योगदान दिले. विविध उपक्रमातून ते तरूणाईला दिशा देण्याचे काम करीत आहे.महाट्रेड फेअरचे भव्यदिव्य आयोजन नगरकरांना जगभरातील संधींची माहिती देणारे ठरेल. जास्तीत जास्त नागरिकांनी आवर्जून याठिकाणी भेट द्यावी. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाट्रेड फेअरच्या आयोजनाचे कौतुक करून यामुळे नगरच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविकात जितो अहमदनगरचे चेअरमन जवाहर मुथा यांनी सांगितले की, महाट्रेड फेअर मध्ये कृषी, उत्पादने, आय.टी, टेलिकॉम, शिक्षण, ग्राहकोपयोगी उत्पादने, अपना बाजार, टोमोबाईल, बांधकाम साहित्य, रियल इस्टेट, अंतर्गत सजावट, लघु उद्योग, महिलांसाठी घरगुती उद्योगाशी, आधुनिक तंत्रज्ञान, नगरच्या वैद्यकीय क्षेत्राची प्रगती संबधित दालन संबंधित 350 हून अधिक स्टॉल्स आहेत. समारोप प्रसंगी बेस्ट स्टॉल अवार्डही देण्यात येणार आहे. या महाट्रेडच्या माध्यमातून राज्यासह देशातील विविध क्षेत्रातील आस्थापना, कंपन्या, उत्पादक नगरमध्ये आल्या आहेत. यंदा लघु उद्योगांनाही चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.बबल थिएटरच्या माध्यमातून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अहमदनगरचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आ.संग्राम जगताप, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत, सी.ए. रमेश फिरोदिया, उद्योजक नितीन कुंकूलोळ, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी मान्यवरांसह जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे चेअरमन अजित शेटिया, व्हाईस चेअरमन गौतम मुनोत, सेक्रेटरी तथा प्रोजेक्ट चेअरमन अमित मुथा, जितो अहमदनगरचे चेअरमन जवाहर मुथा, सेक्रेटरी आलोक मुनोत आदी उपस्थित होते.
COMMENTS