भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी होणार आहे.
२९ डिसेंबर रोजी अखिल भारतीय निवड समितीच्या शिफारशीनुसार बीसीसीआयने जसप्रीत बुमराहचा एकदिवसीय संघात समावेश केला होता. बीसीसीआयने आपल्या मीडिया रिलीजमध्ये म्हटले आहे की, "अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश केला आहे."
बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर आहे आणि पाठीच्या दुखापतीमुळे तो टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर राहिला आहे. बीसीसीआयने पुढे सांगितले की, 'बुमराहचे पुनर्वसन सुरू असून एनसीएने त्याला तंदुरुस्त घोषित केले आहे. तो लवकरच भारतीय संघात सामील होणार आहे.'
परंतु बुमराह वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे आता समोर आले आहे. एनसीए कर्मचाऱ्यांकडून ही शिफारस करण्यात आली आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आणि पुढे वर्ल्डकपमध्ये भाग घ्यायचा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात बीसीसीआयशी चर्चा झाली आहे की नाही, याची पुष्टी होऊ शकली नाही.
सध्या संघ व्यवस्थापन एनसीएच्या सल्ल्याचे पालन करत असल्याचे या अहवालात सांगण्यात येत आहे. बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दिसू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची नवे; रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग .
COMMENTS