गोरेगाव । नगर सह्याद्री मॉडेल व्हिलेज गोरेगाव (ता. पारनेर) येथे मुख्यालय असणार्या आणि पारनेर तालुक्यात चर्चेत असलेली अग्रगण्य अशा गोरेश्...
गोरेगाव । नगर सह्याद्री
मॉडेल व्हिलेज गोरेगाव (ता. पारनेर) येथे मुख्यालय असणार्या आणि पारनेर तालुक्यात चर्चेत असलेली अग्रगण्य अशा गोरेश्वर पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली.
गोरेश्वर पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक सभासदांनी निवडणुकीसाठी आग्रह धरला होता. यामध्ये विद्यमान चेअरमन बाजीराव पानमंद व जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे या दोघांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. बाबासाहेब तांबे गटाकडून पारनेर नगरपंचायतचे बांधकाम समितीचे सभापती नितीनशेठ अडसूळ, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, सुपा गावचे उपसरपंच सागर मैड, दैठणे गुंजाळचे उपसरपंच संजय आंग्रे, भाळवणीचे मा. चेअरमन बाळासाहेब तरटे, गोरेगावच्या मा. सरपंच मीराताई नरसाळे, निवृत्त विस्तार अधिकारी मंज्याबापू तांबे, निवृत्त मुख्याध्यापक रामराव तांबे, पत्रकार राम तांबे अशा दिग्गजांचे अर्ज दाखल झाले होते. या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
अतिशय सुस्थितीत असणारी ही आर्थिक संस्था झपाट्याने शाखा विस्तार करत आहे. अनेक पुरस्कार संस्थेने मिळविले आहेत. त्यामुळे राज्य कार्यक्षेत्र असणारी ही संस्था निवडणूक लागल्यास विस्कळीत होईल, त्यामुळे संस्थेचे विद्यमान चेअरमन बाजीराव पानमंद यांनी बाबासाहेब तांबे यांच्याकडे बिनविरोधसाठी विनंती केली. त्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत बाबासाहेब तांबे यांनी आर्थिक संस्था टिकली पाहिजे, गावचा नावलौकिक वाढला पाहिजे या हेतूने उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालत सर्वच अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना विश्वासात घेऊन ही निवडणूक अखेर बिनविरोध केली. तालुक्यात एक चांगला संदेश या निमित्ताने दिला. गावचा एकोपा जपण्यातही यश आले. या निवडणुक प्रक्रियेमध्ये 11 जागांसाठी 11 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत दुय्यय निबंधक कार्यालयाचे गणेश औटी यांनी काम पाहिले.
COMMENTS