हैदराबादमधील अपस्केल बंजारा हिल्समध्ये एका ग्राहकाच्या पाळीव कुत्र्याने फूड डिलिव्हरी बॉयवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील अपस्केल बंजारा हिल्समध्ये एका ग्राहकाच्या पाळीव कुत्र्याने खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी गेलेला फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्यापासून वाचण्यासाठी तो तिसर्या मजल्याकडे धावला पण कुत्रा त्याच्या पाठी लागला. त्यानंतर फूड डिलिव्हरी बॉयने जीव वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.
बंजारा हिल्सचे पोलीस निरीक्षक एम नरेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफगुडा येथील श्रीरामनगर भागातील मोहम्मद रिजवान (२३) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एनआयएमएस) येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
एम नरेंद्र यांनी सांगितले की, फूड डिलिव्हरी अँप स्विगीवर काम करणारा रिजवान हा शोभना नावाच्या ग्राहकाला फूड पार्सल देण्यासाठी बंजारा हिल्स येथील रोड क्रमांक ६ येथील लुंबिनी रॉक कॅसल अपार्टमेंटमध्ये गेला होता. रिझवान हे पार्सल ग्राहकाला देत असताना, त्यांच्या कुटुंबाचा पाळीव कुत्रा (जर्मन शेफर्ड) घरातून बाहेर आला आणि त्याने त्याच्यावर झडप घातली. हल्ल्याच्या भीतीने रिजवानने जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्याने त्याचा पाठलाग केला आणि त्याने अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. रिझवान जमिनीवर पडून जखमी झाला. दरम्यान, शोभनासह इतर शेजाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेत त्याला उपचारासाठी निम्समध्ये हलवले. तो अजूनही बेशुद्ध असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवारी संध्याकाळी रिजवानचा भाऊ मोहम्मद खाजा याच्या तक्रारीनंतर बंजारा हिल्स पोलिसांनी शोभनाविरुद्ध कलम ३३६ (निष्काळजीपणामुळे दुखापत) गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
COMMENTS