पुणे / नगर सह्याद्रि - पुण्यातील कोंढवा भागातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीसाठी नवीन घर घेता यावं म्हणून पतीने 37 लाख रुपयांच्या दागि...
पुणे / नगर सह्याद्रि -
पुण्यातील कोंढवा भागातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीसाठी नवीन घर घेता यावं म्हणून पतीने 37 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केलीय. दागिने चोरणाऱ्या चोर पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मलाप्पा होसमानी (वय, 31) असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
कोंढव्यात राहणाऱ्या बबीता डिसूजा यांनी ख्रिसमसच्या दिवशी त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली होती. ख्रिसमस असल्याने डिसूजा कुटुंबीय रात्री बाहेर गेले असताना आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन खिडकीला लावलेले ग्रील तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्याने घरातील सोने, चांदीच्या दागिन्यांबरोबर डायमंड, नेकलेस आणि महागडी घड्याळ देखील लंपास केली. डिसूजा कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच डिसूजा कुटुंबीयांनी थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयित व्यक्ती घराच्या भागात वावरत असताना आढळून आला. या व्यक्तीच्या गाडी नंबरवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान मलाप्पाने हे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. परंतु, चोरीचे कारण दिल्यानंतर पोलिस देखील बुचकळ्यात पडले. प्रेम विवाह झाल्यामुळे घरचे फारसं लक्ष देत नव्हते. कुटुंबासोबत अनेक वेळा वाद झाले. प्रेम विवाह केल्यामुळे घरच्यांनी घरातून हाकलून दिले होते. मात्र पत्नीसाठी नवीन घर घेता यावं आणि तिथे एकत्र राहता यावं यासाठी त्याने घरफोडी करण्याचा प्लॅन बनवला.
दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने असा 37 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
COMMENTS