नाशिक / नगर सहयाद्री नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एक...
नाशिक / नगर सहयाद्री
नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. या वादात एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार सुद्धा केल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
एका वृत्त वहिनीच्या माहितीनुसार, नाशिक मधील कदेवळाली गावात ही घटना घडली आहे. येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले होते. तर याच ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा होते. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली.
या बाचाबाचीतून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. क्षणार्धात तणाव इतका वाढला, की यातील एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या बैठकीवेळी किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली यावरून दोन्ही गट आमनेसामने आले. यातून एका गटाने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे. या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्ते निघून गेल्यानं तणाव निवळला आहे. दरम्यान, नेमका कोणत्या गटाने गोळीबार केला? या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे
COMMENTS