मुंबई / नगर सहयाद्री- सदर घटना धारावीमध्ये भररस्त्यात घडली. पत्नीसमोरच चाकूने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली. पतीला वाचविण्याचा प्रयत्न ...
मुंबई / नगर सहयाद्री-
सदर घटना धारावीमध्ये भररस्त्यात घडली. पत्नीसमोरच चाकूने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली. पतीला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवरही चाकूचा वार करण्यात आल्याने ती जखमी झाली. धारावी पोलिसांनी याप्रकरणात हल्ला करणारा आणि त्याला मदत करणाऱ्या अशा दोघांना अटक केली.
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार धारावी येथे वास्तव्यास असलेले मोहम्मद जाहिद आणि त्यांची पत्नी मलकासबा हे दोघे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. हसन खान आणि त्याच्या मित्राने जाहिद यांची दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला. जाहिद दुचाकी थांबवत नसल्याचे पाहून दोघांनी त्यांना दुचाकीवरून ढकलले. जाहिद आणि मलकासबा दोघेही दुचाकीवरून खाली पडले.
दोघेही यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच अलीहुसेन याने धारदार चाकू काढला आणि जाहिद याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. पतीला वाचविण्यासाठी मलकासबा पुढे सरसावली. तिला बाजूला करण्यासाठी अली हुसेन याने तिच्यावरही चाकूहल्ला केला. तिच्या हातावर यामुळे दुखापत झाली. मलकासबा बाजूला होताच त्याने जाहीदच्या छातीमध्ये चाकू घुसवला. जाहीद खाली पडल्याचे पाहून दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. येथील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी हल्ल्यात जखमी झालेल्या पती-पत्नीला रुग्णालयात दाखल केले. जाहीद याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर मलकासबा हिच्यावर उपचार सुरू आहे.
COMMENTS