बीड / नगर सहयाद्री- बीडच्या केज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना समोर आली आहे...
बीड / नगर सहयाद्री-
बीडच्या केज तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. या जीवघेणा हल्ल्यातून त्या बालंबाल बचावल्या असून सध्या त्यांच्यावर बीडच्या केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
एका वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, बीडच्या नायब तहसीलदार आशा वाघ आज जेवण करून तहसील कार्यालयाकडे येतअसताना, एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांचा रस्ता अडवला. चारचाकी वाहनातून उतरलेल्या एका महिलेसह इतर 4 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बॉटलमधील पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यातून त्या बालंबाल बचावल्या आहेत.
यापूर्वी ही केज येथील तहसील कार्यालयात घुसून नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर,कौटुंबिक कलहातून त्यांच्या सख्ख्या भावानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. नायब तहसीलदार आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यात वार करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
आशा वाघ आणि त्यांच्या भावामध्ये शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. आशा वाघ यांच्यावर हल्ला कोणी केला हे अद्याप समोर आलेलं नाही. पण मधुकर वाघ यांनी हा हल्ला केल्याची चर्चा सुरु आहे. पण आधीच्या हल्ल्याप्रकरणी मधुकर वाघ सध्या तुरुंगात आहेत. आरोपी हल्ल्यानंतर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
COMMENTS