सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा - सारोळा सोमवंशी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरच सहा महिन्याप...
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा - सारोळा सोमवंशी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरच सहा महिन्यापासून खडीचे ढिगारे टाकल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते. याबाबत दैनिक नगर सह्याद्री ने सडेतोड लेखनीने वृत्त प्रसिद्ध करताच बांधकाम विभाग खडबडून जागा झाला व संबंधित ठेकेदाराला रस्ता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ठेकेदाराने रस्त्यावरील खडी उचलून रस्त्याचे काम पूर्ण केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुयातील शेवटचे टोक असलेल्या व श्रीगोंदा तालुयाला जोडणारा भोयरे गांगर्डा- सारोळा सोमवंशी रस्त्याकडे तत्कालीन आमदार खासदारांच्या वतीने सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या रस्त्यावर साधी खडी देखील टाकण्यात आलेली नाही.
गेली सहा महिन्यापूर्वी आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते भोयरे गांगर्डा- सारोळा सोमवंशी या एक किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. एक किलोमीटर का होईना रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागेल या असेने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र संबंधित ठेकेदारांने गेली सहा महिन्यापूर्वी रस्त्याच्या कडेला खडीचे ढिगारे टाकल्याने ग्रामस्थांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. दळणवळणाच्या दृष्टीने दोन्ही तालुयांना जोडणारा हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून शेतातून पिकवलेला माल मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा, पारनेर, अहमदनगर, शिरूर, पुणे या ठिकाणी नेण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो तसेच दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, रसाळवाडी कडे हा रस्ता जात असल्याने ग्रामस्थांना ये जा करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. मुख्य म्हणजे याच रस्त्यावर श्री दत्त विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना ये - जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या अडचणींवर मात करण्यासाठी संबंधित ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. मात्र रविवारी संबंधित ठेकेदाराने रस्ता पूर्ण केल्याने व रहदारी साठी होणारा अडथळा दूर झाल्याने ग्रामस्थांनी दैनिक नगर सह्याद्री चे आभार मानले आहेत.
COMMENTS