अहमदनगर । नगर सह्याद्री गेल्या काही दिवसांपासून नगर शहर व परिसरात चांगलीच हुडहुडी भरली असून, या थंडीत सहकुटुंब हुरडा पार्ट्यांचा आनंद घेत...
अहमदनगर । नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून नगर शहर व परिसरात चांगलीच हुडहुडी भरली असून, या थंडीत सहकुटुंब हुरडा पार्ट्यांचा आनंद घेतला जात आहे. शहर परिसरात असलेल्या विविध ठिकाणी हुरडा पार्ट्यांसाठी गर्दी वाढत आहे.
डिसेंबरपर्यंत गायब असलेली थंडी आता चांगलीच कडाडली आहे. सकाळपासून भरलेली ही हुडहुडी दिवसभर असते. सायंकाळनंतर रस्त्यावरील वर्दळ देखील यामुळे तुरळक झाली आहे. दिवसेंदिवर पारा खाली येत आहे. संपूर्ण देशातच आता थंडीची लाट आली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचे असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा पाचच्या खाली आला आहे. विदर्भात येते काही दिवस कडाक्याचे थंडीचे असतील, असेही जाहीर करण्यात आले आहे.
मनपासह जिल्ह्यातील विविध नगरपालिकांचे स्वच्छता कर्मचारी, ऊस तोड कामगार यांची या थंडीमुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे. ऊस तोड कामगारांना रात्री उशीरापर्यंत आणि पहाटे लवकरच ऊस तोडणीसाठी जावे लागते. एकीकडे बिबट्याचे भय आणि दुसरीकडे रक्त गोठवणारी थंडी असा दुहेरी सामना त्यांना करावा लागत आहे. नगरमध्ये महापालिका कामगारांनाही थंडीला तोंड देत स्वच्छतेचे काम करावे लागत आहे. सकाळी फिरायला जाणार्यांची संख्या जशी रोडावली, त्याचप्रमाणे सायंकाळनंतर रस्त्यावरील वाहतूकही थंडीमुळे आहे. सोशल मीडियावर तापमानाच्या माहितीसोबतच हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती घरबसल्या मिळत असल्याने अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या भूमिकेत नागरिक आहेत.
एकीकडे थंडीने गारठवले असतानाच दुसरीकडे गरमागरम हुरड्यावर ताव मारण्यासाठी गर्दी होत आहे. नगर शहराजवळ असलेल्या पांजरपोळ, साईबन, रानवारा, सोनेवाडी रोड, केशरबाग, खंडाळा, औरंगाबाद रोड, फलके फार्म आदी ठिकाणी हुरडा पार्टींचे आयोजन केले जाते. सुट्यांच्या काळात येथे जागा मिळणे कठीण असते. त्यामुळे आठवडाभर अगोदरच बुकिंग करून जागा निश्चित केल्या जात आहे. नगरबरोबरच बाहेर गावच्या नागरिकांनीही नगर परिसरातील या ठिकाणांना पसंती दिल्यामुळे दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. गौर्यांचा शेक घेत हुरड्याचा आस्वाद घेतला जात आहे.
COMMENTS