शिवसेना शहरप्रमुख कदम यांची माहिती । महापौरांनी निधी उपलब्ध करून दिला अहमदनगर । नगर सह्याद्री नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा...
शिवसेना शहरप्रमुख कदम यांची माहिती । महापौरांनी निधी उपलब्ध करून दिला
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न नवीन वर्षात मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात 10 कोटी रुपयांच्या निधीतून बहुतांश कामे प्रस्तावित आहेत. वाढीव दर पत्रकांना मंजुरी व त्यानंतर कामे रखडल्यामुळे या कामांचा खर्च वाढला. या निधीतील सर्व कामे मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेकडे पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. रक्कम मोठी असल्याने व प्रस्तावित कामांच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या असल्याने महापालिका प्रशासनाला निधी उपलब्ध करून देण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही कामे घेतलेल्या ठेकेदाराने कामाचा खर्च वाढल्याने जुन्या दराने कामे करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने यासाठी 50 ते 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करत पाच प्रमुख रस्त्यांची कामे मार्गे लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली.
भूयारी गटार योजना, पाणी योजना आदी कामामुळे शहरातील रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे मंजूर असल्याने महापालिकेला या ठिकाणी नव्याने कामे मंजूर करता येत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभाग यातून मार्ग काढायला तयार नाही. महापालिकेने यासाठी आता पुढाकार घ्यावा, अशी मागणी महापौर रोहिणी शेंडगे यांच्याकडे केली होती. त्यानुसार रखडलेल्या रस्त्यांपैकी पाच प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देत प्रशासनाची तांत्रिक अडचण दूर केली आहे. पाच प्रमुख रस्ते मार्गे लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कमी पडणारा 50 ते 60 लाख रुपयांचा निधी महापालिका उपलब्ध करून देणार आहे.
या निर्णयामुळे रामचंद्र खुंट ते तेलीखुंट ते नेता सुभाष चौकपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (दाळमंडई, झंवर ते तेलीखुंट पॉवर हाऊस, आडतेबाजार, काळूराम मंगलचंद कोठारी ते झंवर वगळून), अहमदनगर वाचनालय ते चितळेरोड ते चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट वेसपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, नगर वाचनालय ते भाजप कार्यालय ते पटवर्धन चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, तख्ती दरवाजा ते घुमरे गल्ली ते लक्ष्मी कारंजापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, शहर सहकारी बँक, नवीपेठ ते लोढा हाईट्सपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ही पाच प्रमुख रस्त्यांची कामे येत्या काही दिवसांत मार्गी लागणार आहेत.
COMMENTS