अहमदनगर । नगर सह्याद्री गावठी कट्टे व काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने नगरमध्ये आलेल्या बीड येथील तरुणाला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच...
अहमदनगर । नगर सह्याद्री
गावठी कट्टे व काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने नगरमध्ये आलेल्या बीड येथील तरुणाला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चांदणी चौक परिसरात आरटीओ कार्यालयाच्या गेटजवळ पकडले आहे. शुक्रवारी (दि.27) दुपारी 3 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सुयोग उर्फ छोट्या मच्छिंद्र प्रधान (वय 23, रा.माळी वेस, बीड) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 1 लाख 13 हजार 700 रुपये किंमतीचे 3 गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना खबर्या मार्फत माहिती मिळाली की, एक इसम चांदणी चौक परिसरात आर.टी.ओ. कार्यालयाच्या गेट जवळ गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार आहे. ही माहिती मिळताच पो.नि. कटके यांनी कारवाईसाठी पथक पाठविले.
या पथकाने त्या परिसरात जावून सापळा लावला असता 3 वाजण्याच्या सुमारास 1 युवक तेथे आला. तो संशयीतरित्या वावरत असल्याने पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केली असता त्यात 3 गावठी कट्टे आढळले तर त्याच्या पॅन्टच्या खिशात 12 जिवंत काडतुसे आढळून आली. या पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध साहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS