अहमदनगर । नगर सह्याद्री सहा महिन्यांपूर्वी हक्काच्या पैशांसाठी उपोषण आंदोलन करूनही खात्यात असलेले लाखो रुपये परत दिले जात नसल्याने नगर अर...
अहमदनगर । नगर सह्याद्री
सहा महिन्यांपूर्वी हक्काच्या पैशांसाठी उपोषण आंदोलन करूनही खात्यात असलेले लाखो रुपये परत दिले जात नसल्याने नगर अर्बन बँकेच्या कर्जतमधील खातेदारांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजल्यापासून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महेश जेवरे, जयदीप तापकीर व रमेश तापकीर (दोघे रा. खांडवी, कर्जत) यांनी दिला आहे.
नगर अर्बन बँकेच्या कर्जत येथील शाखेत महेश जेवरे यांच्या असलेल्या करंट खात्यात 31 लाख 6 हजार 244 रुपये आहेत. जयदीप तापकीर यांचे व त्यांचे वडील राम तापकीर यांचे कर्जत शाखेतील चालू खात्यात 9 लाख 50 हजार रुपये आहेत व रमेश तापकीर यांचे 7 लाख 70 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. हे पैसे परत मिळावेत म्हणून मागील दीड-दोन वर्षांपासून त्यांचा बँकेकडे पाठपुरावा सुरू आहे. बँकेच्या सत्ताधार्यांद्वारे हे पैसे दिले जात नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांचे कारण सांगितले जाते. खात्यातील हक्काचे पैसे मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण व लग्न कार्यासाठी तसेच शेती व अन्य कामांसाठी बाहेरून व्याजाने पैसे घेण्याची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पैसे मिळावेत म्हणून त्यांनी येत्या 26 जानेवारीला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महेश जेवरे, जयदीप तापकीर व रमेश तापकीर यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. नगर अर्बन बँकेवर भ्रष्टाचारामुळे रिझर्व्ह बँकेने कारवाई केल्याने बँकेचे व्यवहार बंद झाले आहेत. अनेकवेळा विनंती करूनही आमच्या ठेवी अद्याप मिळत नाहीत. भ्रष्टाचार ज्या संचालकांनी केला, तेच सध्या सत्तेवर असल्याने तसेच चुकीचे कर्ज दिलेल्या व संचालकांनीच भ्रष्टाचार केल्याने ते वसूल करीत नाहीत. या संचालकांवर पोलिसांकडे केस दाखल आहे. पण पोलिसांकडून कोणतीही कडक कारवाई होत नसल्याने बँकेचे संचालक वसुली करीत नाहीत. जे थकीत कर्जदार आहेत, ते बँकेच्या दृष्टीने गुन्हेगार आहेत. या कर्जदारांकडे वसुलीसाठी बँक त्यांच्याकडे गेल्यास कर्जाचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, ते तत्कालीन संचालकांनी परस्पर घेतले, असे सांगतात. संचालक म्हणतात, कर्जदार पैसे भरत नाहीत. दोघांवर कारवाई झाली तरच सत्य बाहेर येईल. बँकेवर गेल्या दोन वर्षांपासून कायदेशीर कारवाई चालू आहे. पोलिसांच्या दिरंगाईमुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने कारवाई करावी व आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळवून द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. 15 दिवसात याबाबत ठोस कारवाई झाली नाहीतर 26 जानेवारीला पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा जेवरे व तापकीर यांनी दिला आहे. नगर अर्बन बँकेत ज्यांचे पैसे अडकले आहेत, अशा खातेदारांनी 26 जानेवारीला होणार्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जेवरे व तापकीर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी 9563637111 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS