साद पडसाद / सुहास देशपांडे - विरोधातील एखाद्या नेत्याबाबत संशयाचे जाळे निर्माण करायचे, त्यांच्यावर ’संशयित’ म्हणून ठपका पडला की आपल्याकडे ओ...
साद पडसाद / सुहास देशपांडे -
विरोधातील एखाद्या नेत्याबाबत संशयाचे जाळे निर्माण करायचे, त्यांच्यावर ’संशयित’ म्हणून ठपका पडला की आपल्याकडे ओढण्यासाठी हालचाली करायच्या, हा गेल्या काही वर्षातील राजकारणाचा फंडा बनला आहे. भाजप यात इतरांपेक्षा जास्त वाकबगार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना जे काही घडले ते पाहता सत्यजित तांबे हे प्यादे असून, मुख्य टारगेट बाळासाहेब थोरात आहेत, हेच दिसून येते.
न गर जिल्ह्यातील अनेक राजकीय कुटुंबे राज्यात गाजली. राज्यावर त्यांनी प्रभावही पाडला. मात्र थोरात आणि विखे हे दोन कुटुंब सर्वात प्रभावी ठरले. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. या दोन कुटुंबात जिल्ह्यात विळ्या भोपळ्याचे नाते असले तरी एकाच सत्तेत दोघांनीही सहभाग घेतला आहे. या दोन कुटुंबांमुळेच नगर जिल्ह्यात काँग्रेस विचार जिवंत होता. राज्यात सर्वात मोठा असलेल्या नगर जिल्ह्यात हातपाय पसरायला भाजपसाठी हे दोन नेते मोठा अडसर होते. विखे यांनी नेहमीच आपला गट मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलेले होते. गट विस्तारित करताना त्यांनी कधीच पक्षभेद ठेवला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागात विखे गटामध्ये विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते असायचे. त्यात भाजपचेही होते. याचा फायदा विखे यांना प्रत्येक निवडणुकीत झालेला आहे. त्या तुलनेत थोरात यांनी भाजपवाल्यांना कधीच जवळ केले नाही. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजपला विखे यांच्या ताकदीचा अनेकदा फायदा झाला, मात्र थोरात यांच्याकडून कधीच फायदा मिळू शकला नाही.
कालांतराने विखे भाजपवासी झाले. मात्र भाजपवासी होण्यापूर्वी ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देशात हा वेगळा संदेश गेला. काँग्रेसचे असलेल्या एका विरोधी पक्षनेत्याचा मुलगा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवितो, हा संदेश भाजपला राजकारणासाठी महत्त्वाचा वाटला. विखे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी त्यावेळच्या देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात बरेच रान उठविले होते. मात्र हे करत असताना त्यांचा रोख सर्वाधिक सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर होता. मंत्रालयात अनेक वर्षे काम केल्याने माहिती कशी काढायची याची हातोटी विखेंकडे होती, पण चर्चा घडवून आणली गेली की भाजपकडून त्यांना माहिती पुरविली जात होती. त्यावेळी शिवसेना सत्तेत असूनही देवेंद्र आणि भाजपवर टीका करत होती. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांकडून विखे यांना माहिती पुरविली जात असल्याची चर्चा घडवून आणण्यात आली. यामुळे आपोआपच विखे यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण होण्यास संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस आणि भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात ‘तुमच्या सर्वांबरोबर असल्यानंतर मला माझ्या घरात आल्यासारखे वाटते’ हे विखे यांचे वक्तव्य या संशयाला पुष्टी देणारे ठरले आणि पुढील रामायण घडत गेले.
गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख यांच्याबाबतही असाच संशय निर्माण केला जात आहे. चव्हाण-फडणवीस यांची चर्चा झाल्याच्या बातम्या हा संशयाचे वलय निर्माण करण्याचाच प्रकार होता. चव्हाण, देशमुख या दोघांनीही भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी सध्याचे वातावरण पाहता यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. भविष्यात काहीही होऊ शकते, असे काँग्रेसमध्येच बोलले जाते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या काही वर्षांत काँग्रेसपासून अलिप्त आहेत. या अलिप्तवादाचा फायदा घेत त्यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा घडवून आणल्या गेल्या. असाच प्रकार वडेट्टीवार यांच्याबाबतीतही मध्यंतरी झाला होता. संशयाचे जाळे टाकायचे आणि गंमत पहायची, संधी मिळाली तर गंमत घडवून आणायची, असा हा प्रकार मीडियाच्या माध्यमातून केला जातो. यासाठी सोशल मीडियाचा वापर वारेमाप केला जातो.
काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात हे एकमेव नेते अशा संशयाच्या भोवर्यात सापडले नव्हते. वास्तविक थोरात यांनी भाजपमध्ये यावे, यासाठी पूर्वीही प्रयत्न झाले आहेत. मूळ काँग्रेसी विचार त्यांच्या डोक्यातून काढून विकासात्मक कामासाठी त्यांनी साथ द्यावी, यासाठी मातृ शाखेतर्फेही प्रयत्न झाल्याची मध्यंतरी चर्चा होती. मात्र थोरात यापासून दूर राहिलेच, पण आपल्याबाबत संशयाचे जाळे निर्माण होऊ नये, यासाठीही त्यांनी विशेष काळजी घेतली होती. हे करत असताना कोणाशीही संबंध दुरावणार नाहीत, याची काळजीही त्यांनी घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून सत्यजित तांबे यांच्या त्यांच्याशी भेटीगाठी होत होत्या. गेल्या काही वर्षात भाजपची दिशा पाहिल्यास युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा विचार सातत्याने बोलून दाखविला जात आहे. सत्यजित तांबे अत्यंत महत्त्वकांक्षी आहेत. त्यांच्या स्वभावाचा हा पैसून निदर्शनास आल्यामुळे थोरात कुटुंबाचे दार उघडण्यासाठी ही फट सापडली. एकदा फट सापडल्यानंतर दार जास्तीत जास्त किलकिले करण्याचा प्रयत्न न करेल तर ती भाजप कसली? सत्यजित तांबे यांनी भाषांतरित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन हे निमित्त ठरले, पण प्रयत्न अगोदरपासूनच जोरदार सुरू होते. आतापर्यंत जवळपास फिरकू न देणारे बाळासाहेब थोरात यांच्यावर संशयाचे जाळे फेकण्यासाठी त्यांच्या भाच्याचे म्हणजे सत्यजित यांचे हात आयते मिळाले. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जे काही घडले त्यावरील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता तांबे पितापुत्रांपेक्षा त्यांचा सर्वाधिक रोख थोरात यांच्यावरच असल्याचे दिसून येत आहे. ‘जे काही घडले, ते बाळासाहेबांना माहित नव्हते’ असे मानायला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगेपासून संगमनेरच्या तालुकाध्यक्षापर्यंत कोणीच तयार नाही. अर्ज दाखल केल्यानंतर ‘मी महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे’ असे सत्यजित यांनी सांगणे आणि त्या पाठोपाठ ‘नाशिकमध्ये भाजपने कोणालाही उमेदवारी दिली नाही. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास विचार करू’ असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी करणे, हा काही योगायोग नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर सत्यजित तांबे यांचा उल्लेख बंडखोर म्हणून करत त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले. हे वक्तव्य पटोले यांचे वैयक्तिक नाही, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून आहे. उद्या जरी बाळासाहेबांनी ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला तरी पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर केलेली भूमिका काँग्रेस बदलणार का? एवढे होऊनही भाजपला अद्याप सत्यजित आपल्याकडे येईलच, याची खात्री नाही. त्यामुळेच ‘त्यांनी पाठिंबा मागितला तर विचार करू’ असे सांगितले जात आहे. डॉ. तांबे यांनी गेल्या तीन टर्ममध्ये मतदारसंघाची केलेली बांधणी, पदवीधरांचा मिळविलेला विश्वास, केलेली मतदार नोंदणी याचा विचार करता त्यांच्या कुटुंबासाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही. मात्र या माध्यमातून आणखी एका महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याभोवती त्यांच्या पक्षात अविश्वासाचे, संशयाचे वातावरण निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरला आणि हाच त्यांचा विजय म्हणावा लागेल.
भाजपला जे हवे, ते घडतेय...
‘काहीतरी वेगळे शिजत असल्याचे आपण बाळासाहेबांना सांगितले होते, पण त्यांनी दुर्लक्ष केले’ असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेब थोरात यांच्यावर खापर फोडले आहे. ‘जे काही घडणार, त्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, पण काँग्रेसला जाग आली नाही’ असे म्हणत शिवसेनेच्या मुखपत्रातही रोष व्यक्त केला आहे. केवळ काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीमध्ये थोरात यांच्यावर अविश्वासाचे ढग निर्माण केले जात आहेत. भाजपला जे हवे ते आपोआप घडून येत आहे.
COMMENTS