देवीच्या भक्तीगीतांवर स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर अहमदनगर | नगर सह्याद्री पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्य...
देवीच्या भक्तीगीतांवर स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर
अहमदनगर | नगर सह्याद्री
पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी देवीच्या भक्तीगीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन स्त्री शक्तीचा जागर केला. आदिशक्तीची रुपं असलेल्या देवीचे दर्शन घडवून भक्तीमय वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली. दुर्गा देवीने अवतरुन केलेल्या महिषासुर वध व छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते स्वराज्याची मुहुर्तमेढ हे क्षण आपल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी जिवंत केले. त्याला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर देवीचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
प्रारंभी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक मनोज दुलम, उपाध्यक्ष विलास पेद्राम, सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, खजिनदार जयंत रंगा, विश्वस्त राजेंद्र म्याना, जितेंद्र वल्लाकटी, संगमनेरच्या नगरसेविका शोभा थोरात, माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल, दिपक रामदिन, बालाजी मंदिराचे संचालक नारायण कोडम, नारायण यन्नम, गणेश येमूल, सागर येमूल, माजी शिक्षिका भारती बुरगुल, प्रमिला चिलवर, प्राचार्य संदिप छिंदम, श्रीनिवास मुत्त्याल, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे आदी उपस्थित होते.प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी ढोल व लेझीम पथकासह फुलांचा वर्षाव करुन पाहुण्यांचे स्वागत केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या गणित-विज्ञान, रांगोळी, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली.पाहुण्यांचे स्वागत माध्य. मुख्यध्यापक शशीकांत गोरे यांनी केले. माध्यमिकचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे, वैशाली वरुडे व मीनाक्षी बिंगेवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अहवाल वाचनात डॉ. रत्नाताई बल्लाळ यांनी सर्व सामान्य कामगारांच्या मुलांनी कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा आलेख मांडला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साकारलेल्या हस्तलिखीताचे विमोचन करण्यात आले. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य मार्कंडेय विद्यालय करत आहे. श्रमिकांचे भवितव्य शिक्षणाने बदलून समाज परिवर्तनाचे कार्य ही संस्था करत आहे. शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी देऊन त्यांना यशाचा मार्ग दाखविण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप म्हणाले की, गुणवत्तेपुढे गरिबी व परिस्थिती अडवी येत नाही. स्वत:मधील गुणवत्तेचा तेज दाखविल्यास त्याला सर्वांचा सलाम असतो. कायद्याच्या कचाट्यात अडकू नका, त्यामुळे संपूर्ण भविष्य उध्वस्त होते. पालकांनी देखील मुलांशी सुसंवाद ठेऊन त्यांची संगतीकडे लक्ष द्यावे. मोबाईलमुळे पालक व मुलांमधील सुसंवाद बिघडल्याने मुलांचे भविष्य अंधकारमय होत आहे. पालकांनी मुलांना आत्मविश्वास व प्रोत्साहन द्यावे. मुलांनी देखील पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे त्यांनी आवाहन केले. बाळकृष्ण सिद्दम यांनी स्वतःमधील क्षमता ओळखा. प्रत्येकात वेगवेगळ्या क्षमता असून, त्या क्षमता ओळखल्यास यश मिळवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा सुरकुटला, अनिता आडेप व गितांजली काकडे यांनी केले. आभार भारती गाडेकर यांनी मानले.
COMMENTS