परस्पर विरोधी गुन्हे दाखल । शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रोहोकले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा पारनेर । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील ग्राम...
परस्पर विरोधी गुन्हे दाखल । शिंदे गटाचे तालुकाप्रमुख रोहोकले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा
पारनेर । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा खाली बसतो न बसतो, तोच शुक्रवारी रात्री राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्या भाळवणी येथे दोन गट परस्पराला भिडले आहे. या भांडणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास उर्फ बंडू रोहकले यांच्या पेट्रोल पंपाच्या केबिनच्या काचा फुटल्या. विरोधी गटाने रोहकले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
भाळवणीच्या सार्वत्रिक निवडणूकीत विरोधी असलेल्या उमेदवाराशी चर्चा करीत असताना झालेल्या शिवीगाळीतून दोन गट एकमेकांविरोधात भिडले. त्यातून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जबरी चोरीचे गुन्हे दोन्ही गटांवर दाखल असून विकास रोहोकले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात विकास रोहोकले यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे, की दि.5 जानेवारीला रात्री 8 च्या सुमारास ते घरून त्यांच्या कल्याण रस्त्यावरील श्री माऊली पेट्रोल पंप येथील ऑफिसमध्ये गेले होते. ऑफिसमध्ये कामकाज पाहत असताना अविनाश सूर्यकांत रोहोकले पेट्रोल पंपावर आला. पंपावर असलेल्या कर्मचार्यांशी तो विनाकारण वाद घालू लागला. त्यापाठोपाठ तेथे दत्तात्रय केरूभाऊ रोहोकले, दीपक भागुजी रोहोकले, सूर्यकांत केरूभाऊ रोहोकले हजर होऊन वाद घालून मारहाण करू लागले. त्यापैकी एकाने तेथे असलेला पेव्हींग ब्लॉक उचलून कार्यालयाच्या काचेवर फेकून मारल्याने काच फुटली. त्यांनी पंपावर कामास असलेल्या संदीप पांडूरंग रोहोकले याच्या कडील 1 लाख, दिलीप पांडूरंग रोहोकले याच्याकडील दोन तोळे सोने घेतले. पंपाची तोड फोड करून ते तेथून निघून गेले.
दुसरी फिर्याद महिलेने दाखल केली असून रात्री साडेआठच्या सुमारास विकास भाऊसाहेब रोहोकले दोन पांढर्या गाडयांसह त्यांच्या घराजवळ आला. दुसर्या गाडयांमध्ये जयसिंग रोहोकले, अक्षय रोहोकले, नामदेव रोहोकले होते. विकासने घरात येऊन साडीचा पदर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. आरडा ओरडा केल्यानंतर बाहेर जाताना चापट मारून गळयातील दीड तोळयाचे गंठण घेऊन पळून गेला. दोन्ही फिर्यादींवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
COMMENTS