मुंबई । नगर सह्याद्री - नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवा...
मुंबई । नगर सह्याद्री -
नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म मिळूनही अर्ज भरला नाही. त्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून अर्ज भरला.
दरम्यान, काल झालेल्या या घडामोडींबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना काँग्रेस बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका नाना पाटोले यांनी जाहीर केली आहे.
मी सगळ्या परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती दिली असून आज पक्ष पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. मात्र, सत्यजित तांबेना आमचा पाठिंबा नाहीच असे नाना पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले...
नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेत आपले पुत्र सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी मार्ग मोकळा केला होता. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. पण सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी पत्ते उघड करत ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यामुळे सत्यजीत यांचा मार्ग मोकळा झाला असला तरी काँग्रेस पक्षावर रिंगणात उमेदवार नसण्याची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज न भरणाऱ्या सुधीर तांबे आणि त्यांच्या मुलावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. 'माझ्यापर्यंत जी काही ऐकीव माहिती पोहोचली आहे त्यावरुन हे प्रकरण गंभीर वाटत आहे. पक्षश्रेष्ठींनी या सगळ्याची गंभीर दखल घेतली पाहिजे, किंबहुना त्यांनी घेतली आहे. हा विषय आमचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांना कदाचित यातील अधिक माहिती असू शकेल. हे सगळं का घडलं, यामागील वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. या सगळ्यामुळे पक्षाला एक जागा गमवावी लागत आहे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे', असे चव्हाण यांनी म्हटले.
आम्ही पक्षाकडून सुधीर तांबे यांनी तिकीट दिले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरात पक्षाबरोबर फसवेगिरी केली आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळं काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार नाही. आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज भरून सुधीर तांबे यांनी सांगितले की आम्ही भाजपचा पाठिंबा घेणार आहे. ही एकप्रकारे काँग्रेसशी गद्दारी असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवरही टीका केली आहे. भाजपमध्ये भय दाखवून घरे फोडणायचे काम सुरू आहे. भाजप आज दुसऱ्याची घरे फोडून आनंद घेत आहे. पण ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल त्यादिवशी त्यांना घरे फोडण्याचे दु:ख काय असते ते कळेल असे पटोले म्हणाले.
नाशिकमध्ये भाजपाने उमेदवार देखील दिला नाही. हा सगळा ठरलेला कार्यक्रम होता हे यावरून स्पष्ट आहे. नाशिकमधील पदवीधर लोकं अडाणी नाहीत. त्यांनाही हे सर्व समजते आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी एका भाजप नेत्याला फोन केला आहे. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी देऊ नका, अशी विनंती त्यांना केली आहे. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला, अशी चर्चा सुरू आहे. थोरात आणि तांबे कुटुंबात अंतर्गत कलह आहेत, ते आम्ही चर्चेतून सोडवू, असे थोरात यांचे म्हणणे आहे. थोरात यांची कन्या राजकारणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाट्य घडल्याची चर्चा सुरू आहे.
आम्ही कोणाचाही घरं फोडलेली नाहीत: हर्षवर्धन पाटील
हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांनी एबी फॉर्म दिला त्या नेत्याने उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. हा काँग्रेसचा अंतर्गत गोंधळ आहे, यामध्ये भाजपचा काहीही हात नाही. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला, त्यांना एबी फॉर्म का मिळाला नाही?, हे आम्हाला माहिती नाही. भाजपची स्थापना कोणाचेही घर फोडण्यासाठी झालेला नाही. भाजपने कोणालाही ऑफर दिलेली नाही. एखाद्याने अपक्ष म्हणून पाठिंबा मागितला तर त्याचा निर्णय भाजपचे नेते वरिष्ठ पातळीवर घेतील, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
COMMENTS