खा. संजय राऊत ः नाशिकमध्ये पाठिंब्याचा निर्णय ‘मातोश्री’वरील बैठकीत मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रात सत्तेत असताना शिवसेना, काँग्रेस आणि ...
खा. संजय राऊत ः नाशिकमध्ये पाठिंब्याचा निर्णय ‘मातोश्री’वरील बैठकीत
मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात सत्तेत असताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो समन्वय होता, तो आता दिसत नाही, अशी स्पष्ट कबुली खासदार संजय राऊत यांनी दिली.
अमरावतीमध्ये काँग्रेसने ठाकरे सेनेच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ही जागा आम्ही जोरात लढलो असतो, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय मातोश्रीवरच्या बैठकीत होणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार आम्ही किमान समान कार्यक्रमावर चालवले. तिन्ही पक्षात उत्तम समन्वय होता. तोच एकोपा आता विरोधी पक्षात काम करताना असला तरच पुढच्या लढाया लढू शकतो, ही भूमिका शिवसेनेची आहे. विधान परिषद निवडणुकीत गोंधळ झाला आहे. तो नाकारू शकत नाही. काँग्रेस पक्षासंदर्भात ही घटना घडली असली, तरी याकडे महाविकास आघाडी म्हणूनच लक्ष दिले पाहिजे. विधान परिषदेच्या पाच जागां संदर्भात एकत्रित बसून भमिका ठरवणे, चर्चा करणे हवे होते.
संजय राऊत म्हणाले की, नागपूरची जागा असेल, अमरावतीची जागा असेल. या दोन्ही जागांबाबत काळजीपूर्वक निर्णय घेणे गरजेचे होते. अमरावतीच्या जागेवर काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. त्यांनी आमचा उमेदवार घेतला. मग आम्ही का नाही लढलो? आम्ही जागा मागत होतो. आमचे बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे त्यांनी तयारी केली होती. काँग्रेसने त्यांनाच उमेदवारी दिली. ती जागा आम्ही लढलो असतो, तर अधिक जोरात लढलो असतो. नाशिकचा घोळ झाला त्या संदर्भात कुणालाच दोष देता येणार नाही. अशा प्रकारच्या उलट्या-पालट्या सर्वच पक्षात होतात. तांबे कुटुंब परंपरागत काँग्रेसचे निष्ठावान कुटुंब आहे. तेव्हा त्यांच्यावर अविश्वास कसा काय दाखवायचा? उद्या जाऊन ते असा निर्णय घेणार आहेत किंवा त्यांच्या डोयात काय चालले आहे किंवा भाजपने काही गुप्त कारवाया केल्या हे प्रत्येक वेळेस आपल्याला समजते असे नाही. भविष्यात महाविकास आघाडी आणि आघाडीतल्या प्रमुख नेत्यानी समन्वय ठेवल्यास असे प्रसंग येणार नाहीत.
वेगळे शिजत असल्याचे बाळासाहेबांना सांगितले होते ः पवार
नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळेच शिजत आहे, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते. मात्र त्यांनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले. नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी नवा ट्विस्ट निर्माण झाला. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना त्यांच्या जागी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अचानक शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. यावर अजित पवार म्हणाले, दोन दिवसांपासून कानावर वेगळे येत होते. त्यामुळे मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशी पूर्णपणे सांगितले. काहीतरी वेगळे शिजत आहे, माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी म्हणालो होतो. मात्र बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. उद्या डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
COMMENTS