अहमदनगर । नगर सह्याद्री नगर जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत अज्ञात शक्ती काम करत असते. या अज्ञात शक्तीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविका...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत अज्ञात शक्ती काम करत असते. या अज्ञात शक्तीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना अहमदनगर जिल्ह्यातून आघाडी मिळेल, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार ती अज्ञात शक्ती कोणती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील शनिवारी देशमुख अहमदनगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी आयोजित बैठकीत देशमुख बोलत होते. यावेळी अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षा रेश्माताई आठरे, शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक दहिफळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्याम वागस्कर, भिंगार काँग्रेसचे सरचिटणीस अनिल परदेशी, राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, रूपाली पुंड, रेणुका पुंड, काँग्रेसच्या नलिनी गायकवाड, सुनिता बागडे, शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे, राष्ट्रवादीचे अमित खामकर, अनंत गारदे, घोरपडे, काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश सचिव फिरोज शफीखान, अभिजीत कांबळे, राजेश भाटिया, मुकुल देशमुख, हर्षवर्धन देशमुख यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते व्यक्ती पूजेपेक्षा विचारधारेला व पक्षाच्या आदेशाला महत्त्व देतात. त्याचप्रमाणे या जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत अज्ञात शक्ती कार्यरत असते. या शक्ती निवडणूक निकालाला दिशा देतात. त्यामुळे नगर जिल्ह्यातून शुभांगीताईंना निश्चितच आघाडी मिळेल. उमेदवार शुभांगी पाटील म्हणाल्या, मी सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून उभी असून मागील अनेक वर्षे मी शिक्षकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करीत आहे. आझाद मैदानावर दिडशेपेक्षा जास्त आंदोलनाचे नेतृत्व मी केले आहे. धनशक्तीच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता या निवडणुकीत इतिहास घडवावा.
शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते म्हणाले, या मतदारसंघातून प्रथमच शुभांगीताईंच्या रूपाने महिला उमेदवार निवडणूक लढवीत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील 90% पेक्षा जास्त महिला त्यांनाच मतदान करतील. शिवसेनेचे अशोक दहिफळे, काँग्रेसचे अनिल परदेशी यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन शाम वागस्कर यांनी केले. विनोद साळवे यांनी आभार मानले.
COMMENTS