सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल । अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंस सस्पेन्स कायम नाशिक । नगर सह्याद्री - महाविकासआघाडीकड...
सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल । अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंस सस्पेन्स कायम
नाशिक । नगर सह्याद्री -
महाविकासआघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली. काँग्रेसनेही डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी घोषित केली. सुधीर तांबे यांच्याच नावाने एबी फॉर्म आला, मात्र, ऐनवेळी सुधीर तांबेंनी आपली उमेदवारी मागे घेत मुलगा सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला आहे. याबाबत स्वतः सुधीर तांबेंनी माहिती दिली.
सुधीर तांबे म्हणाले, सत्यजीत तांबे राज्यात जे तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवा नेतृत्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे हे या निवडणुकीत हे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला आहे. फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. सत्यजीत तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही. कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत. काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं, असं मत सुधीर तांबेंनी व्यक्त केलं. शेवटच्या क्षणापर्यंत विचार सुरू असतात. त्यामुळे माझ्या नावाची घोषणा झालेली असतानाही सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबेंनी दोन अर्ज भरले आहेत. एबी फॉर्म माझ्या नावाने आला होता. त्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या निवडणुकीत निवडणूक चिन्ह नसतं. त्यामुळे सत्यजीत या निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमदेवार म्हणून उभे आहेत. सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे, असंही सुधीर तांबे म्हणाले.
सत्यजीत तांबे म्हणाले ...
मी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवावी, असा काँग्रेसमधील अनेकांचा आग्रह होता. पण पक्षाने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. तांत्रिक अडचणीमुळे शेवटच्या क्षणी मी दोन उमेदवारी अर्ज भरले, एक काँग्रेसचा होता, एक अपक्ष होता. परंतु, माझ्या नावाचा एबी फॉर्म न मिळाल्याने मला अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल. मी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार आहे, मी आजपर्यंत काँग्रेसच्याच विचारावर काम केले आहे. मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहे आणि विनंती करणार आहे. राजकीय पक्षाच्या विचारसरणीच्या, सीमांच्या पलीकडे या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी उभे राहावे, अशी माझी अपेक्षा आहे. मला सर्वांचा पाठिंबा मिळावा, असा प्रयत्न मी करणार आहे. अद्याप मी भाजपच्या कोणत्याही नेत्याशी बोललेलो नाही. काँग्रेस पक्षाच्या कोट्यात ही जागा होती, त्यामुळे कोण उमेदवार असणार, हा निर्णय आमचा होता. काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मला तीन वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळू शकला नाही. त्यामुळे मी अपक्ष लढणार आहे. मी मनसे, भाजप, रासप यासह सर्व राजकीय पक्षांना मला निवडून देण्याचे आवाहन करत आहे. मी गेल्या 22 वर्षांपासून संघटनेत काम करत आहे. युवकांचे प्रश्न मांडत आहे. हे प्रश्न मोठ्या पटलावर घेऊन जायचे असतील तर विधानपरिषदेसारख व्यासपीठ हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी मला पाठिंबा द्यावा, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले.
COMMENTS