ट्विटर, फेसबूकवरून हटविले काँग्रेसचे नाव मुंबई । नगर सह्याद्री विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल करणारे सत्यजित...
ट्विटर, फेसबूकवरून हटविले काँग्रेसचे नाव
मुंबई । नगर सह्याद्री
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल करणारे सत्यजित तांबे यांनी वडिलांवर पक्षाने कारवाई केल्यानंतर स्वतः पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. ट्विटर आणि फेसबुकवरील बायोमधून त्यांनी काँग्रेस पक्षाचे नाव हटवले आहे.
राज्यात सर्वाधिक चर्चेची ठरलेली नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करणारे व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांना पक्षाने चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे. त्या पाठोपाठ आता त्यांचे चिरंजीव अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे सत्यजित तांबे यांनी काँग्रेसपासून वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत. सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटर व फेसबुकवरील बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव हटवले आहे. तसेच त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर एक संदेश झळकत आहे. ’वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व सिद्ध करावचं लागतं’ असा सूचक मजकूर त्यात आहे. या माध्यमातून काँग्रेसचा आधार न घेता सत्यजित तांबे पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांना साद घालताना दिसत आहेत.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे आपण वरिष्ठांनाही कळवल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे. मात्र, काँग्रेसने तांबे यांचे वडील आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. तेव्हापासूनच सत्यजित तांबे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने सत्यजित तांबे यांच्या निलंबनाची शिफारस केली असली तरी अद्याप प्रदेश काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यातच आपल्या सोशल मीडियावरुन काँग्रेस पक्षाची ओळख त्यांनी हटविल्याने काँग्रेस पक्षाशी असलेले नाते तोडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
काँग्रेसच्या निर्णयानंतरच राष्ट्रवादीचा निर्णय ः अजित पवार
नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंशी बोलणं झालं आहे. शरद पवार यांनीही काही नेत्यांशी चर्चा केली आहे. तसेच काँग्रेसने तांबे पिता-पुत्रावर कारवाई केली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात आघाडीचा उमेदवार कोण असेल? याबाबत चर्चा सुरू आहे. काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे? त्यानुसारच राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय घेईल. शुभांगी पाटील यांनाही ठाकरे गटाने पाठिंबा जाहीर केला आहे, याबाबतही उद्यापर्यंत निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
COMMENTS