हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील प्रकार । कर्जदारांचे उपोषण पारनेर । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील गांजी भोयरे येथील हनुमा...
हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील प्रकार । कर्जदारांचे उपोषण
पारनेर । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील गांजी भोयरे येथील हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये बोगस कर्ज प्रकरणाचा घोटाळा उघड झाला असून कर्ज घेतले नसतानाही कर्ज माथी मारण्याचा प्रकार काही शेतकर्यांबाबतीत घडला आहे. त्यामुळे गांजी भोयरे येथील रेवजी बाबा खोडदे व नामदेव मंजाबा पांढरे या दोन ज्येष्ठ नागरिकांनी 17 जानेवारीला कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
यासंबंधीचे निवेदन पारनेरचे सहाय्यक निबंधक गणेश औटी यांना दिले आहे. निवेदनाची प्रत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा उपनिबंधक, तहसीलदार व पारनेर पोलीस ठाण्याला दिली आहे. निवेदनात म्हटले की आम्ही गांजी भोयरे येथे शेती व्यवसाय करतो. मला दि. 07 नोव्हेंबर 2022 रोजी पोस्टाने मी कधीही न घेतलेल्या कर्जाची नोटीस आली आहे. वरील संस्थेकडून कोणत्याही प्रकारची कर्जाची मागणी केलेली नव्हती व नाही. नोटीस मिळाल्यानंतर मी संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब गणपत खोडदे यांना भेटलो. मी कधी कर्ज घेतले याची विचारणा केली. चेअरमन म्हणाले, हे कर्ज हे बोगस असून तुम्ही काळजी करु नका. तुम्हाला मी संस्थेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही म्हणून नील दाखला 4 दिवसात देतो. चेअरमन यांच्या सांगण्यावरुन मी 4 दिवसांनी परत त्यांची भेट घेतली व नील दाखल्याची मागणी केली.
त्यावेळेस चेअरमन म्हणाले, संस्थेची अकौंटंट श्रीमती संगिता दिलीप चत्तर या सध्या पुणे येथे गेल्या आहेत. त्या आल्यानंतर नील दाखला देतील आणि मी त्यावर सही करतो. मी सौ. संगिता चत्तर यांच्या घरी गेलो त्यावेळेस आम्हाला समजले की, त्या पुणे येथे गेलेल्या असून 15-20 दिवसांनी येतील. मी पुन्हा 15-20 दिवसांनी संगिता चत्तर यांना फोन केला व नील दाखल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माझा संस्थेशी काहीही संबंध नाही. तुम्ही चेअरमन यांच्याकडून नील दाखला घ्या. मी पुन्हा चेअरमन यांची भेट घेतली व त्यांना नील दाखल्याची मागणी केली असता त्यांनी सांगितले की, मी आरोपी आहे, मला दाखला देता येत नाही. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करु शकता.
सहायक निबंधकांना याद्वारे कळवितो की, मी वरील संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही. मला वकिलामार्फत नोटीस आली आहे. नोटीस मिळाल्यापासून माझ्या कुटुंबात भितीचे वातावरण आहे. कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता नोटीस कशी आली? माझ्या व्यतिरिक्त गावातील पाच व्यक्तींना अशाच नोटीसा आल्या असून सर्वच भयभीत आहेत. मी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसल्याने हा माझ्यावर अन्याय आहे.
मी कर्ज घेतले असल्यास कोणत्या तारखेला, कोणत्या अकौंटवर पैसे दिले याचा खुलासा करावा. 10 दिवसात मला न्याय न मिळाल्यास दि. 17 जानेवारीला कुटुंबासह तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहे. त्यानंतर होणार्या परिणामाची जबाबदारी संस्थेचे चेअरमन व आपल्या कार्यालयाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS