नवी जागा की तांबेचेच कार्यालय वापरणार! अहमदनगर | नगर सह्याद्री पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने सत्यजित तांबे यांनी दाखल केलेला अर्ज आणि त्...
नवी जागा की तांबेचेच कार्यालय वापरणार!
अहमदनगर | नगर सह्याद्री
पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने सत्यजित तांबे यांनी दाखल केलेला अर्ज आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर नगर शहरासह जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकार्यांमध्येही आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाचे नगरमध्ये कार्यालय नाही. ज्या कार्यालयाचा सध्या संपर्क कार्यालय म्हणून वापर होतोय ते सत्यजित तांबे यांच्या मालकीचे! सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेतृत्वाने विरोध करत अन्य पर्याय चाचपण्यास प्रारंभ केला आहे. यापार्श्वभूमीवर तांबे यांचे कार्यालय काँग्रेस पदाधिकारी वापरणार की अन्यत्र हलविणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. अपक्ष उमेदवारीने बाळासाहेब थोरात हे आधीच अडचणीत आले असताना नगर शहरात आल्यावर बसायचे कोठे असा प्रश्न आता थोरात यांच्यासमोर असणार आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचीही आता मोठी गोची होणार आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सध्या चालू आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली असताना त्यांनी ती दाखल केली नाही. उलटपक्षी त्यांनी मुलगा सत्यजित याच्यासोबत जाऊन त्याचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सुधीर तांबे यांनी पक्षाला दगाफटका दिल्यानंतर त्याचे पडसाद लागलीच उमटले. सुधीर तांबे असे करतील असं कोणालाच वाटलं नव्हतं! त्यांनी जे काही केले ते अतिशय शांत डोक्याने केले. तांबे यांच्या याच भूमिकेने आता बाळासाहेब थोरात यांच्या काँग्रेसमधील प्रतिमेला तडे गेले आहेत.
काँग्रेस पक्षात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून बाळासाहेब थोरात हे पक्षश्रेष्ठींच्या गुडबुकमध्ये जाऊन बसले.
सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीत मोठा भूकंप झाला. त्यावर आता प्रतिक्रिया उमटताना दिसत असल्या तरी नगर शहरासह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर वेगळीच समस्या उभी ठाकली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी अथवा प्रमुख कार्यकर्ते हे गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या अधिकृत कार्यालयाच्या शोधात होते. मात्र, कार्यालय काही केल्या मिळत नव्हते. सत्यजित तांबे यांच्या मालकीचे लालटाकी येथे प्रशस्त कार्यालय आहे. हेच कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांचे संपर्क कार्यालय झाले होते. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची रोजच या कार्यालयात उठबस राहायची. जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांचाही राबता येथेच असायचा. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील नगरमध्ये आल्यानंतर याच कार्यालयात कार्यकर्त्यांना आणि शिष्टमंडळांना भेटायचे.
आता सत्यजित तांबे यांनी घेतलेला वेगळा निर्णय आणि काँग्रेस पक्षासोबत केलेला दगाफटका याचा विचार करता तांबे यांच्या मालकीचे हे कार्यालय यापुढे काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि दस्तुरखुद्द बाळासाहेब थोरात हे वापरणार का असा प्रश्न आहे. सर्वात मोठी गोची झालीय ती किरण काळे यांची! काळे यांचा रोजचा राबता आणि बैठका याच कार्यालयात व्हायच्या! आता यापुढे ते याच कार्यालयात बसून काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षशिस्तीचे धडे देणार की अन्य पर्यायी जागा निवडणार हे लवकरच दिसून येईल.
COMMENTS