सारीपाट / शिवाजी शिर्के - जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या आपल्या देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन गुरुवारी आपण साजरा करतोय. 26 जानेवारी 19...
सारीपाट / शिवाजी शिर्के -
जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्या आपल्या देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन गुरुवारी आपण साजरा करतोय. 26 जानेवारी 1950 रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
तिरंगा दिमाखाने झेपावत असताना देशप्रेमाचा फिवर फुटाफुटावर दिसेल. जयहिंदचा नारा झडेल. सारं वातावरण देशभक्तीनं न्हाऊन निघेल. भ्रष्टाचारासह गुन्हेगारीनं बरबटलेले हात ध्वजाला सलाम करता करता तुम्हाआम्हाला नैतिकता, नितिमत्तेचे ढोस पाजतील. दुसरीकडे इमानेइतबारे राबणारे हात तांबडं फुटायच्या आत सर्जा राजाला घेऊन शेतात. त्याच्या दृष्टीने त्याचा हाच प्रजासत्ताक! राबणारा हात शेतात आणि सावमंडळी मात्र, मीच प्रजासत्ताक आणल्याच्या तोर्यात! खरंच आपलं जगणं इतकं थंड झालंय की आपण केलंय! प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपलं जगणं आपल्याला कळलं तरी पुरेसे!
हा देश तुमच्याकडून काहीच मागत नाही. सकारात्मकता वाढीस लागावी हीच काय ती अपेक्षा आहे. देशातील वाढता भ्रष्टाचार दिसत असताना एक नागरिक म्हणून आपल्यालाही काही कर्तव्य बजावयचे आहे याची जाणिव आपण विसरतो. आपल्यातील निगेटीव्हपणा कमी होण्याची आज गरज आहे. नव्या दमाच्या पिढीसमोर देशाबद्दल आपण काही चांगले ठेवाणार आहोत की नाही आणि बोलणार आहोत की नाही हेही एकदा ठरवून घेतले पाहिजे.
माझ्या देशावर माझे प्रेम असल्याचे बोलत असताना त्याचवेळी देशाच्या नकारात्मक बाबींवर चर्चा करीत बसणारी मंडळीही आपण पाहतो. आपल्या देशाला बोलक्या पोपटांची नव्हे तर कर्तव्य बजावणार्या नागरिकांची गरज आहे.
दीडशे वर्षे आपल्या अधिपत्याखाली या देशाला ठेवणार्या इंग्रजांनी देशाची संपूर्ण संपत्ती लुुटल्यानंतर हा देश आपल्या ताब्यात दिला. राजकीय साक्षरता अभावानेच दिसणार्या या देशात शिक्षणाचे प्रमाण त्यावेळी अत्यल्पच होते. आज दिसताहेत तसे पुढारी त्यावेळीही कमी नव्हते. मात्र, त्यावेळी सामाजिक पुढारपण करणार्या मंडळींनी हा देश घडविला. काहींनी बिघडविलाही. गेली अनेक वर्षे हा देश आपल्यातील कमतरतेशी लढा देत आलाय. विविध ध्येय साध्य करीत असताना अनेकांची आक्रमणे परतवून लावली आणि लोकशाही अधिक बळकट केली.
शेजारील देशांमध्ये धार्मिक हुकुमशाही आणि वैचारिक हुकुमशाहीचे स्तोम माजले असताना आपला देश वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाशी नाळ बांधत राहिला. शिकलेली मुले राजकारणात सक्रिय होत गेली आणि देशाचे चित्र बदलू लागले हे वास्तव कसे नाकारता येईल. शिकलेली मुले राजकारणात आली ती विकासाची भाषा बोलू लागली. पैशाच्या जोरावर होणारे राजकारण विकासाच्या मुद्यावर आले आणि विकासाचे रस्ते खुले झाले. जनता सजग झाली.
विकासाच्या रस्त्यावर देश चालू लागला असल्याने आता आपण सर्वांनीच जबाबदार नागरिकाची भूमिका पार पाडली पाहिजे. विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेत थेट सहभाग घेताना चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धाडस दाखवावे लागणार आहे. राजकारण माझा प्रांत नाही असे म्हणूण आता चालणार नाही. भारत माझा देश आणि मी या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे, असे म्हणून चालणार नाही. तर त्याच्या जोडीने वाईटाला वाईट, चांगल्याला चांगले म्हणावेच लागणार आहे. जेे जे चांगले आहे ते स्वीकारतानाच चांगले काय आणि वाईट काय हेही समजून घेण्याची गरज आहे. देश माझ्यासाठी काय करेल यापेक्षा मी देशासाठी काय करेल हे जास्त महत्त्वाचे आहे.
पोलिस आणि रुग्णवाहिकेपेक्षाही तुमच्या घरी आज पिझ्झा लवकर पोहोचतो. वाहन कर्ज स्वस्त आणि शैक्षणिक कर्ज महाग. तांदूळ महाग आणि मोबाईल सिमकार्ड स्वस्त! पायतील चपला वाताणुकूलीत दुकानात तर पोटात घालायच्या भाज्या रस्त्यावर विकल्या जातात, लिंबाच्या शितपेयात कृत्रिम स्वाद मिळत असताना दुसरीकडे भांडी धुण्याच्या साबणात अस्सल लिंबू दिसते, चहाच्या टपरीवर बालमजुरीच्या विरोधात बोलणारे तुम्ही-आम्ही त्याच टपरीवरील सात वर्षांच्या छोट्याला ‘छोटू दोन चहा’, असे मोठ्या आवाजात सांगतो, तरी सुद्धा माझे माझ्या देशावर प्रेम आहे! कधी बदलणार आपण आपली मानसिकता! चला आज प्रजासत्ताक दिनी देश बिघडविण्याचा नव्हे तर घडविण्याचा संकल्प करू या! देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी माझ्या देशासाठी काय करतोय, याचे चिंतन करू या! प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘नगर सह्याद्री’ आणि ‘न्यूज 24 सह्याद्री’ परिवाराच्या वतीने सर्वांना शुभेच्छा!
COMMENTS