कोल्हापूर / नगर सहयाद्री- राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने आज पहाटेच छापेमारी सुरु केली आहे. त्...
कोल्हापूर / नगर सहयाद्री-
राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने आज पहाटेच छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे. मुश्रीफ यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तर अवघ्या कोल्हापुरातील कार्यकर्ते मुश्रीफ यांच्यासोबत उभे आहेत.
कोल्हापुरातील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे. कारखान्यातील 98 टक्के पैसा हा मनी लाँडरींगच्या माध्यमातून जमवण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलाय.या घोटाळ्यात मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांचाही प्रमुख सहभाग आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना काही वर्षांपूर्वी अवसायनात काढण्यात आला होता. हा कारखाना बिस्क इंडिया कंपनीला विकण्यात आला. बिस्क इंडिया कंपनी ही हसन मुश्रीफ यांचे जावाई मतीन मंगोली यांच्या मालकीची आहे. या व्यवहारासाठी कोलकाता येथील बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने बोगस खाती तयार करण्यात आली होती. बोगस खात्यांमध्ये टाकलेले पैसे मतीन मंगोली यांच्या बिस्क इंडिया कंपनीत वळते करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बिस्क इंडिया कंपनीला त्यापूर्वी कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नाही, तरीही कंपनीला हा कारखाना हस्तांतरीत करण्यात आला, यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने योग्य लिलाव केला नाही, असे आरोप करण्यात आले आहेत.कारखाना हस्तांतरीत करण्यासाठी केवळ बिस्क इंडिया कंपनीच कशी सापडली, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.घोटाळ्या प्रकरणी ईडीमार्फत आज छापेमारी सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
COMMENTS