मकर संक्रांतीनिमित्त जय आनंद महावीर महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात अहमदनगर | नगर सह्याद्री तीळगुळ घ्या गोड बोला असा ...
मकर संक्रांतीनिमित्त जय आनंद महावीर महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात
अहमदनगर | नगर सह्याद्री
तीळगुळ घ्या गोड बोला असा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण अतिशय उत्साहवर्धक आहे. महिला या सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम ठेऊन एकमेकींना वाण देतात. अशा एकत्र येण्याने चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते. आपापसात स्नेह वृद्धिंगत होतो, असे प्रतिपादन जय आनंद महावीर युवक महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या मुथा यांनी केले.
जय आनंद महावीर युवक महिला मंडळाच्या सदस्यांनी नुकताच मकर संक्रांतीच्या सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम घेतला. यावेळी सर्व महिला सदस्यांनी एकमेकींना सौभाग्याचे वाण दिले. सेक्रेटरी सुरेखा बोरा, महिला उपाध्यक्ष मयुरी सावदेकर, राधिका कासवा, सहसेक्रेटरी शिल्पा गांधी आदींसह सर्व सदस्या यावेळी उपस्थित होत्या. तब्बल दोन अडीच तास महिलांनी गप्पागोष्टी करत तसेच छोटे छोटे गेम खेळून एकत्रितपणे सणाचा आनंद लुटला. कार्यक्रमानिमित्त सर्व महिला पारंपरिक पेहराव करून आल्या होत्या. राधिका कासवा यांच्या मराठमोळ्या पेहरावाचे सर्वांनी कौतुक करून त्यांना मंडळातर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
सेक्रेटरी सुरेखा बोरा म्हणाल्या की, महिला मंडळ अनेक वर्षांपासून सण उत्सव, राष्ट्रीय सण साजरे करीत असते. मकरसंक्रांतीच्या हळदी कुंकू कार्यक्रमालाही मोठी परंपरा आहे. सध्याचा काळ खूप वेगवान आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येकालाच शर्यत जिंकायची असते. यातून कळत नकळतपणे अनेकांना दुखावले जाते. आपण स्वत:ही इतर कोणामुळे दुखावलेले असतो. अशावेळी मकरसंक्रांतीचा गोड सण ही कटुता कमी करण्यास नक्कीच महत्वाचा ठरतो. शेवटी मयुरी सावदेकर यांनी आभार मानले.
COMMENTS