सरचिटणीस विनायक देशमुख यांची खा. सुजय विखेंकडे मागणी अहमदनगर । नगर सह्याद्री तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथुन शिर्डीला येणार्या भाविकांची संख...
अहमदनगर । नगर सह्याद्री
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथुन शिर्डीला येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेता शिर्डी - हैदराबाद (नगर-दौंड सोलापूर मार्गे) शताब्दी एक्सप्रेस तातडीने सुरू करण्यात करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी खा. सुजय विखे पाटील यांच्याकडे केली.
देशमुख यांनी अहमदनगर येथे खा. विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना नगर दक्षिण भागाचा पर्यटन विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मिती याबाबत मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी अहमदनगर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सरचिटणीस तुषार पोटे उपस्थित होते.
या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या धार्मिक स्थळी देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील भाविकांचा मोठा समावेश आहे. त्या दृष्टीने शिर्डी ते हैदराबाद व्हाया अहमदनगर- दौंड- सोलापूर- या मार्गाने शताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात यावी. जेणेकरून भाविकांना दर्शनासाठी येणे अधिक सुलभ होईल. याबाबत रेल्वेमंत्री भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडे प्रयत्न करावेत.
शिर्डी येथील विमानतळ आता चांगल्या क्षमतेने कार्यरत आहे. तथापि मुंबई- शिर्डी-मुंबई अशी विमान सेवा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय भाविकांना व मुंबईकरांना या सेवेपासून वंचित राहावे लागते. तरी याबाबत प्रयत्न करून मुंबई- शिर्डी- मुंबई ही विमान सेवा त्वरित सुरू करावी.
अहमदनगर येथे विमान धावपट्टीची मागणी करताना देशमुख म्हणाले, बहुतांश जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विमान धावपट्टी उपलब्ध आहे. मात्र अहमदनगर सारख्या ऐतिहासिक जिल्हास्थळी विमान धावपट्टी उपलब्ध नाही. तरी नगर शहराचे औद्योगिक, धार्मिक, ऐतिहासिक व लष्करी महत्व लक्षात घेता व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अहमदनगर येथे विमान धावपट्टी सुरू करण्यात यावी.
अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ला हे केवळ नगर शहराचेच नव्हे तर जिल्ह्याचे भूषण आहे. या किल्ल्याला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्यात यावी व हा परिसर विकसित करण्यात यावा. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातुन शिर्डीकडे जाणारया भाविकांना नगर किल्ला स्थळी आकर्षित केल्यास नगरच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडून रोजगार निर्मिती शक्य आहे.
नगर शहर परिसरात व जिल्ह्यात राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषिजी महाराज समाधी, अवतार मेहेरबाबा समाधी, मोहोटादेवी, शनि शिंगणापूर, शिर्डी, लष्करी केंद्र, सी.क्यु.ए.व्ही, व एम.आय.आर.सी, राळेगण सिद्धी, हिवरे बाजार अशी अनेक धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, लष्करी महत्वाची ठिकाणे आहेत. शहरात प्रवेश करणारया व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी रेल्वे स्टेशन व बसस्थानक येथे व्यावसायिक पध्दतीचे पर्यटक मार्गदर्शन केंद्र आपल्या खासदार निधीतुन उभारण्यात यावे.
अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मिती याबाबत मागणी करताना देशमुख म्हणाले, नगर शहर व परिसरातील बहुविध पर्यटन स्थळे लक्षात घेता पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. याबाबत नियोजनपूर्वक प्रयत्न झाल्यास या माध्यमातून किमान 5,000 युवकांना रोजगार निर्मिती शक्य आहे. आपल्या सारख्या उच्च शिक्षित व अभ्यासु संसद सदस्याकडून नगरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या पाठपुराव्यामुळे नगरचा उड्डाणपूल सुरु झाल्याचा उल्लेख करुन देशमुख यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी विखे पाटील यांच्याकडे केली. या कामी जिथे आवश्यक असेल तिथे काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी या नात्याने पुर्ण सहकार्य राहील, अशी खात्री देशमुख यांनी यावेळी दिली.
COMMENTS