सुप्यातील गुंडागर्दी, ठेकेमाफीया अन् हप्तेखोरीने उद्योजक हैराण; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष घालणार का? सारिपाट / शिवाजी शिर्के उद्य...
सुप्यातील गुंडागर्दी, ठेकेमाफीया अन् हप्तेखोरीने उद्योजक हैराण; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष घालणार का?
सारिपाट / शिवाजी शिर्के
उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल पार पडली. उपमुख्यमंत्र्यांसह उद्योग मंत्रीही या बैठकीस हजर होते. विदर्भ, मराठवाड्यासह पुणे, नाशिक भागात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अगदी नक्षलग्रस्त समजल्या जाणार्या गडचिरोलीमध्ये २० हजार कोटींची गुंतवणूक राहणार्या स्टील प्रकल्पाला बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, हे सारे होत असताना नगर जिल्ह्यातील एकमेव मोठी औद्योगिक वसाहत समजल्या जाणार्या सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये सात कोटींची गुंतवणूक करण्याचा प्रकल्प बैठकीत कोणत्याही उद्योजकाने अथवा कंपनीने राज्य सरकारसमोर सादर केला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये असणारी दहशत, गुंडागर्दी, ठेकेमाफीयांचा उच्छाद आणि त्याला पाठबळ देणारे राजकीय नेतृत्वच यास कारणीभूत ठरले असल्याचे यानिमित्ताने अधोरेखीत झाले आहे. सुपा औद्योगिक वसाहतीच्या या वाताहतीकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर आहे हे उद्योग देखील बाहेर जातील!
पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या त्रिकोणात नगरचा औद्योगिक विकास रखडल्याचा आरोप जुनाच आहे. वास्तविक पाहता नगर शहराजवळ असणार्या एमआयडीसीचे कंबरडे मोडण्यास आणि येथील उद्योग बाहेर जाण्यास येथील स्थानिक कलुषीत राजकारण भोवले! कामगार संघटनांमधील काही अपप्रवृत्तीही त्यास कारणीभूत ठरल्या! नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून सुपा एमआयडीसी विकसित होत असताना येथेही अपप्रवृत्ती जन्माला घातल्या गेल्या! एमआयडीसीने प्लॉट दिल्यानंतर उद्योजक अथवा कंपनीचे अधिकारी तेथे आले की प्लॉट विकसित करण्यापासून ते खडी, सिमेंट, विटा, दगड हे सारे आमचेच, लेबरही आमचेच अशी मागणी करणारे माफीये तयार झाले. या माफीयांना राजकीय वरदहस्त कोणाचा आहे, हे आता लपून राहिलेले नाही.
सुप्यातील अत्यंत मोठी गुंतवणूक करून उभारला जात असलेला ‘तोशीबा’ या प्रकल्पाने येथून गाशा गुंडाळला. कंपनीचे येथे फक्त शेड उभे राहिले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एमआयडीसीमध्ये असणारी काही गुंडांची दहशत, टक्केवारी, ठेके मिळविण्याची स्पर्धा, हप्तेखोरी अन् टक्केवारी या अत्यंत घाणेरड्या प्रकाराला कंटाळून ‘तोशीबा’ या जापनीज कंपनीने सुप्यातून काढता पाय घेतल्याचे वास्तव ‘नगर सह्याद्री’ने समोर आणले. येथील वाढत्या गुंडागर्दी आणि ठेकेदारी माफीयांमुळे सुपा एमआयडीसीमधून गेल्या चार वर्षात सहा मोठे युनीट स्थलांतरीत झाले. कंपन्यांनी येथून स्थलांतर होण्याआधी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकार्यांपासून पोलिस अधिकार्यांपर्यंत सार्यांनाच स्थानिकांचा होणारा त्रास आणि हप्तेखोरीकडे लक्ष वेधले होते. प्रशासकीय यंत्रणेने या कंपन्यांच्या तक्रारी फारशा गांभिर्याने घेतल्या नाही अन् त्यातून हजारो कोटींची गुंतवणूक करणार्या कंपन्यांनी सुपा एमआयडीसीला रामराम ठोकला.
स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी अथवा तत्सम सेवेत घेण्याबाबत उद्योजक आणि कंपन्या सकारात्मक आहेतच! परंतु, त्याआडून एक मोठे रॅकेट येथे चालते. कंपनीने या रॅकेटप्रमुखाच्या मागणीनुसार काम केले नाही तर त्या अधिकार्यांना थेट त्यांच्या कंपनीत जाऊन शिव्यांची लाखोली वाहिली जाते. टक्केवारीतील हा खेळ आजही चालूच आहे. खरं तर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. स्थानिक गुंडांचा आणि टोळ्यांचा उद्योजकांना होणारा त्रास आणि त्यातून येथे वाढत चाललेले गँग़वार वेळीच थांबले नाही तर स्थानिक रहिवाशांनाही त्याचा भविष्यात त्रास होणार आहे. राज्यात सत्तर हजार कोटींचे प्रकल्प येत असताना नगरच्या सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण झालेले गुंडाराज आणि त्यातून उद्योजकांमध्ये निर्माण झालेले भितीचे वातावरण कमी होण्यासाठी विखे पाटील यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसे झाले नाही सुपा औद्योगिक वसाहतीत नगरसारखी परिस्थिती कोणत्याही क्षणी निर्माण होऊ शकते!
पवार साहेब, नक्की कानोसा घ्या!
उद्योजकांच्या आड कोणी येणार असेल तर त्याची गय करणार नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणार्या शरद पवार नेहमी सांगतात! सुप्यात याच्या उलट चाललं आहे. पवारांनीच आता सुप्यात नक्की काय चाललं आहे आणि टक्केवारीतील ठेकेदारीत कोण गुंतलंय याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे. गुंडागर्दी कोण करतंय याचीही माहिती घेण्याची गरज आहे. स्थानिक गुंड कोणाचे आहेत आणि त्यांना राजाश्रय कोणाचा आहे? ज्या कंपन्या बाहेर गेल्या आणि स्थलांतरीत होण्याच्या तयारीत आहेत, त्यांना कोणाच्या राजाश्रीत गुंडांनी त्रास दिलाय याचीही माहिती पवार यांनी घ्यावी! वास्तव समोर आल्यानंतर पवार साहेब देखील नक्कीच कपाळावर हात मारुन घेतील!
COMMENTS