काही प्रमाणात रस्ता मोकळा । बंदोबस्तासाठी पोलीस नेमण्याची मागणी शरद रसाळ । नगर सह्याद्री अहमदनगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा ...
शरद रसाळ । नगर सह्याद्री
अहमदनगर पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा चौक ते मुंजबा हॉटेल व सुपा चौक ते पारनेर रोडवरील दुकानदारांनी काही अंशी अतिक्रमणे मागे घेतल्याने या रस्त्यांनी थोडा का होईना मोकळा श्वास घेतला असुन काही अंशी वहातुकीला दिलासा मिळाला आहे.
नगर- पुणे महामार्गावरील सुपा बस स्थानक चौक व सुपा पारनेर रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असुन यामुळे वहातुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. तर सुपा बस स्थानक चौक ते सुपा विश्रामगृह या मार्गावर सायंकाळी रोज नित्याने वहातुक कोंडी होत आसल्याने वरिष्ठांच्या आदेशाने सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या पुढाकारातुन तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांच्या अध्यक्षतेखाली महामार्गावरील व्यावसायिक, लोकप्रतिनीधी, परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत सुपा पोलिस स्टेशनला बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना तहसिलदार अवळकंठे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की अतिक्रमण धारकांनी स्वतः हून अतिक्रमणे काढावी.
नाहीतर महामार्गाच्या नियमाप्रमाणे कारवाई करत रस्त्याच्या मध्यापासुन 40 मिटर पर्यत सरसकट अतिक्रमणे काढली जातील असा इशारा दिला होता. त्यावेळी सर्वच व्यावसायिकनी स्वतः हून अतिक्रमने कमी करण्याचे मान्य केले होते.
सोमवार, मंगळवार सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांनी सहकार्यासह सुपा बस स्थानक चौकातुन या मोहीमेला सुरूवात केली तेव्हा दुकानदारानी पुढे आलेले शेड, फुलहारासाठी पुढे लावलेले बांबू, दुकानाचे बोर्ड स्वताःहून काढून घेतले. यावेळी अनेकांनी लोखंडी पाईप कापुन अतिक्रमणे मागे घेतली. यामुळे अहमदनगर पुणे महामार्गाने काही प्रमाणात मोकळा श्वास घेतला असला तरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकरी व्यावसायीक आहेत.
बेकरी खरेदी करताना गाड्या या रस्त्यावरच लावल्या जातात. यामुळे बहुतांशी वाहतूक कोंडी होते. यावेळी हार फुले विक्रेते व बेकरी विक्रेते यांनी स्वतःहुन अतिक्रमणे काही अंशी का होईना काढल्याने रस्ताही मोकळा झाला. वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल. सुपा पारनेर रस्त्यावर काही दुकानदारांनी आपली दुकाने मागे घेतल्याने या रस्त्यावरही काही अंशी थोड्याफार प्रमाणात रस्ता मोकळा झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन महामंडळ यांच्यात समन्वय नसल्याने सुपा बस स्थानक चौकही अतिक्रमणात गुरफटला आहे. मागील बैठकिला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते. तर परिवहनअधिकारीही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नसल्याने तहसिलदारांसह अनेकानी नाराजी व्यक्त केली. दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमणे कमी केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
ट्राफीक पोलीस नेमावा
बाजार पेठ दिवसेंदिवस वाढत चालल्याने सुपा शहर गजबजू लागले आहे. सुपा येथे परीसरातील सुमारे 15 ते 16 गावांची मुख्य बाजारपेठ आहे. यामुळे सुपा वाळवणे रस्ता, सुपा चौक ते शासकीय विश्रामगृह, सुपा चौक ते पारनेर रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होते. प्रामुख्याने सुपा चौक ते विश्रामगृह दरम्यान मोठ्या प्रमाणात बेकरी विक्रेते, हार विक्रेते असल्याने वाहने रस्त्यावर पार्कींग केली जातात. यामुळे याठीकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन स्थानिकांसह लांब पल्याच्या प्रवाशांना नेहमी मनस्ताप सहन करावा लागतो. यासह सुपा मेन चौकात अपघात झाल्यानंतर त्यांना मदतीसाठी व वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी ट्राफीक पोलिस नेमावा अशी गेल्या अनेक दिवसापासून विविध संघटनांची मागणी आहे.
अतिक्रमण काढणार्या दुकानदारांचे स्वागत
अहमदनगर पुणे महामार्गावरील सुपा पारनेर रस्ता, बस स्थानक ते शासकीय विश्रामगृह रस्त्यावरील दुकानदारांनी स्वताःहुन अतिक्रमण काढावीत. प्रशासनास कारवाई करण्यास भाग पाडू नये, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठांच्या सुचनांचे तंतोतंत पालन केले जाईल, आज स्वयंस्फुर्तीने अतिक्रमने मागे घेणार्या दुकानदाराचे स्वागत करतो. -नितिनकुमार गोकावे, पोलिस निरिक्षक सुपा.
सुपा-पारनेर रोडवरील अतिक्रमणे काढावीत
अहमदनगर पुणे महामार्गाप्रमाणेच सुपा पारनेर रोडवरील अतिक्रमणने प्राधान्याने काढली पाहिजेत. कारण शाळा कॉलेज रोड, ग्रामपंचायत कार्यालय, भाजी बाजार, मुख्य बाजार पेठ, बँका, पतसंस्था, औद्योगिक वसाहतीसह तालुक्याच्या ठिकाणी जाणारा मार्ग हे सर्व याच मार्गावर आसल्याने येथे दिवसभर वर्दळ असते व हा रस्ता अतिक्रमणाने पुर्ण झाकला आहे. हा मोकळा होणे गरजेचे आहे. -डि. एन. पवार सर, निवृत्त शिक्षक, सुपा.
COMMENTS