मुंबई । नगर सह्याद्री - मुंबई महापालिकेत बुधवारी मोठा राडा झाला आहे. पक्षकार्यालयावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आ...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुंबई महापालिकेत बुधवारी मोठा राडा झाला आहे. पक्षकार्यालयावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहे. महापालिकेतील कार्यालयावर शिंदे गटाने दावा केला आहे. त्यानंतर हा राडा झाला आहे. या राड्यानंतर आता प्रशासकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहे.
एकीकडे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगलेला असताना, दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांनी शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी नगरसेविका शितल म्हात्रे, माजी आमदार अशोक पाटील, युवा प्रमुख दिलीप नाईक व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये बसून विषयावर चर्चा केली आहे.
शिंदे गटाच्या हालचालींची माहिती मिळाताच, उद्धव ठाकरे गटातील माजी आमदारांसह शिवसैनिकांची मोठी फौजच तिथे पोहोचली आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे. कार्यलयाच्या हॉलमध्ये दोन्ही गट एकमेकांसमोर आले आहे. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढले आहे.
दरम्यान, या राड्यानंतर आता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये सील करण्यात आली आहे. सदरचे कार्यालय मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वे तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले आहे. अशी नोटीस पक्षांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे.
COMMENTS